आज (७ मे) आयपीएल २०२६ मध्ये एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ भिडणार आहेत. बंगळुरूकडून खेळणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या सामन्यासाठी मैदानात उतरताच या लीगच्या इतिहासात एक टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे.
भुवनेश्वर आयपीएलच्या इतिहासात २०० सामने खेळणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरेल. त्याच्या या कामगिरीने तो आपल्या टी२० कारकिर्दीत आणखी एक उल्लेखनीय विक्रमाची नोंद आपल्या नावावर करेल. या हंगामाच्या सुरूवातीला ५ एप्रिल, भुवनेश्वर २०० आयपीएल विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला होता. तसेच आयपीएलमध्ये २०० विकेट्सचा टप्पा गाठणारा तो युझवेंद्र चहलनंतरचा दुसराच गोलंदाज ठरला होता.
स्विंग स्पेशालिस्ट सध्या या हंगामातही चांगलाच फॉर्ममध्ये असून त्याने ९ सामन्यांत १७ विकेट्स घेत पर्पल कॅपवर आपला कब्जा केला आहे. आता तो २०० व्या सामन्यासह दिग्गजांच्या खास यादीत सामील होईल. या स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो केवळ १२ वा खेळाडू ठरेल.
भुवनेश्वरच्या कामगिरीचे कौतुक करताना त्याचा बंगळुरूचा संघसहकारी विराट कोहलीने त्याला आयपीएलच्या इतिहासातील अव्वल ३ वेगवान गोलंदाजांपैकी एक असे म्हटले आहे. भुवीने सर्व प्रकारामध्ये भरपूर क्रिकेट खेळले आहेत. त्याची खेळाबद्दलची समज आणि बुद्धिमत्ता पाहता आयपीएलच्या इतिहासातील अव्वल तीन वेगवान गोलंदाजांमध्ये त्याचा नक्कीच समावेश होतो. त्याचा इकॉनॉमी रेट, त्याने घेतलेल्या विकेट्स आणि प्रत्येक सामन्यात तो टाकत आलेल्या निर्धाव चेंडूंची संख्या पाहिली तर ते सर्वच उल्लेखनीय आहे. दबावाखाली असताना प्रत्येकीवेळी त्याच्यावर अवलंबून राहू शकता, असे विराटने म्हटले आहे.
भुवनेश्वर २०० वा आयपीएल सामना खेळणारा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरणार असून यावरूनच त्याचे सातत्य दिसून येते.
२०० किंवा २०० पेक्षा अधिक आयपीएल सामने खेळणारे खेळाडू-
एमएस धोनी – २७८ (२००८-आतापर्यंत)
रोहित शर्मा – २७७
विराट कोहली – २७६
रवींद्र जडेजा – २६४
दिनेश कार्तिक – २५७
शिखर धवन – २२२
आर अश्विन – २२१
अजिंक्य रहाणे – २०७
सुरेश रैना – २०५
रॉबिन उथप्पा – २०५
अंबाती रायुडू – २०४
भुवनेश्वर कुमार – १९९ (आज २०० वा सामना खेळणार)






