आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals vs Kolkata knight Riders) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुकाबला रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचे आतापर्यंत 50 सामने झाले आहेत, पण अद्याप एकाही संघाने प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केलेले नाही आणि कोणीही या शर्यतीतून बाहेर पडलेले नाही. आजचा सामना दिल्ली आणि कोलकाता या दोघांसाठीही महत्त्वाचा आहे; जो संघ हरेल, त्याचा खेळ जवळपास संपेल, तर जिंकणाऱ्या संघाच्या आशा जिवंत राहतील.
यादरम्यान, आयपीएलमध्ये आज पुन्हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामना खेळवला जाईल. दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. त्याआधी अर्धा तास म्हणजे सात वाजता टॉस होईल. केकेआरचा संघ सुरुवातीला सलग सामने हरत होता, त्यांचे साधे खातेही उघडत नव्हते, पण आता संघाने विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न केला आहे. संघाने आपले गेल्या सलग तीन सामन्यांत विजय मिळवला आहे, याच कारणामुळे ते आता आठव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. म्हणजेच सामन्याचा ‘विनिंग मोमेंटम’ त्यांच्या बाजूने झुकताना दिसतोय. संघ गेल्या काही सामन्यांपासून फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
दिल्लीसाठी जमेची बाजू ही आहे की संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे. येथील बाउंड्री लहान आहेत आणि खेळपट्टी देखील संथ दिसत आहे, ज्याचा फायदा कुलदीप यादव (Kuldeep Yadav & captain Axar Patel) आणि कर्णधार अक्षर पटेल घेऊ शकतात. येथे धावांचा पाठलाग करणे सोपे असते. हे मैदान ‘चेझिंग’साठी ओळखले जाते आणि मोठा धावसंख्याही गाठली जाऊ शकते. आजच्या सामन्याचा संभाव्य विजेता केकेआर असू शकतो, पण दिल्लीच्या संघाने आपल्या घरच्या मैदानावर बाजी मारली तर नवल वाटायला नको. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 34 सामने खेळले गेले आहेत. यापैकी केकेआरने 19 आणि दिल्लीने 15 सामने जिंकले आहेत. म्हणजेच आकडेवारीत फार मोठा फरक नाही.
दिल्ली कॅपिटल्स स्क्वॉड:
पथुम निसांका, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, करुण नायर, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, टी नटराजन, विप्रज निगम, अभिषेक पोरेल, औकिब नबी डार, डेव्हिड मिलर, दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, रेहान अहमद, मुकेश कुमार, अजय जादव मंडल, पृथ्वी शॉ, त्रिपुराना विजय, साहिल पारख, माधव तिवारी.
कोलकाता नाईट रायडर्स स्क्वॉड:
अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ॲलन, अंगकृष रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, कॅमेरून ग्रीन, रोव्हमन पॉवेल, मनीष पांडे, अनुकूल रॉय, सुनील नरेन, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंह, तेजस्वी दहिया, नवदीप सैनी, टिम सीफर्ट, रचिन रवींद्र, ब्लेसिंग मुजरबानी, मथीशा पथिराना, राहुल त्रिपाठी, सार्थक रंजन, प्रशांत सोलंकी, सौरभ दुबे, उमरान मलिक, दक्ष कामरा.






