---Advertisement---

RRvsSRH: वैभवचा प्रामाणिक खुलासा! एलिमिनेटरमध्ये वादळी खेळी करताना ‘या’ विक्रमाकडे नव्हतं लक्ष

On: गुरूवार, मे 28, 2026 12:08 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये बुधवारी (२७ मे) एलिमिनेटरच्या सामन्यात पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीचे वादळ आले आणि सनरायझर्स हैद्राबादला उद्ध्वस्त करून गेले. मुल्लाणपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैद्राबादला ४७ धावांनी पराभूत केले. यामध्ये वैभवने २९ चेंडूंत १२ षटकार आणि पाच चौकारांच्या सहाय्याने ९७ धावांची उल्लेखनीय खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भुमिका बजावली. त्याचा हा वेग पाहता एका क्षणाला असे वाटले की तो ख्रिस गेलचा आयपीएलमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडतो की काय? त्याला मात्र या विक्रमाबद्दल काही कल्पनाच नव्हती, असे त्याने सामन्यानंतर सांगितले आहे.

वैभवला प्रफुल हिंगने आठव्या षटकात बाद केले. वैभवच्या स्फोटक खेळीने आरआरने २० षटकांत ८ विकेट्स गमावत २४३ धावा केल्या. वैभव सामनावीर ठरला. हा पुरस्कार जिंकल्यानंतर तो म्हणाला, “मला बाद झाल्यानंतरच कळाले की माझ्याकडून सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम हुकला. त्या वेळी, माझे एकमेव लक्ष माझ्याकडून शक्य तितके योगदान देण्यावर होते, कारण शतके होतच राहणार आहेत. पण सध्या ट्रॉफी कशी जिंकायची यावर लक्ष केंद्रित आहे. जर मला कुठे अडचण येत आहे असे वाटले, तर मी त्यावर काम करतो. प्रतिस्पर्धी काय योजना आखत आहेत याचा मी विचार करत नाही, ती त्यांची योजना आहे. मी माझ्या योजनेवर लक्ष केंद्रित करतो आणि फक्त सामान्य क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो.”

गेलने २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध ३० चेंडूंत शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याने ६६ चेंडूंत १७ षटकार आणि १३ चौकारांसह १७५ धावा केल्या होत्या.

“जेव्हा आम्ही जिंकतो, तेव्हा आम्ही तोच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पुढच्या सामन्याकडे वाटचाल करतो आणि आम्ही पुढचा सामनाही त्याच पद्धतीने जिंकून अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रयत्न करू,” असे वैभवने म्हटले आहे.

“मी थोडाफार विचार करतो, पण खूप जास्त नाही. मी फक्त माझा खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो आणि जास्त विचार करत नाही. पण जर मला वाटले की मला कोणत्यातरी गोष्टीवर काम करण्याची गरज आहे, तर मी त्याकडे लक्ष देतो. मी फक्त विरोधी संघातील गोलंदाज कोण आहेत, या खेळपट्टीवर मी त्यांचा सामना कसा करू शकेन, सीमा किती मोठ्या आहेत, अशा गोष्टींचा विचार करतो. मी माझ्या इराद्याबाबत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो,” असेही वैभवने त्याच्या तयारीबद्दल म्हटले आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना १९.२ षटकांत १९६ धावांवर सर्वबाद झाला आणि त्यांचा या आयपीएल हंगामातील प्रवास संपला. आता आरआर क्वालिफायर २ मध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. हा सामान २९ मे रोजी मुल्लाणपूरमध्येच खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---