इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) आगामी हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या हंगामात दोन नवे संघ चाहत्यांना खेळताना दिसतील. यापैकी एक संघ लखनऊ सुपरजायंट्स तर दुसरा अहमदाबादस्थित असणार आहे. इंग्लंडमधील प्रसिद्ध कंपनी सीव्हीसी कॅपिटल्सने अहमदाबाद फ्रॅंचाईजी विक्रमी किमतीला विकत घेतली होती. आता आयपीएलच्या मेगा लिलावासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना, या संघाने आपले अधिकृत नाव जाहीर केले आहे. (IPL Mega Auction)
या नावाने ओळखला जाणार अहमदाबाद संघ
अहमदाबाद फ्रॅंचाईजीने सोमवारी (७ फेब्रुवारी) आपल्या संघाच्या अधिकृत नावाची घोषणा केली. आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून हे नाव घोषित केले. अहमदाबाद संघ यापुढे आयपीएलमध्ये अहमदाबाद टायटन्स (Ahmedabad Titans) या नावाने सहभागी होणार आहे. संघाने आपला अधिकृत लोगो मात्र अद्याप प्रसिद्ध केला नाही.
विक्रमी किमतीत संघ घेतला विकत
सीव्हीसी कॅपिटल्सने मागील वर्षी अदानी समूहाला मागे टाकत तब्बल ५६२५ कोटी रुपयांची बोली लावत अहमदाबाद फ्रॅंचाईजी विकत घेतली होती. ही कोणत्याही व्यावसायिक क्रिकेट संघावर लावली गेलेली दुसरी सर्वात मोठी बोली ठरलेली. त्यानंतर, या बोलीवरुन बराच वादही निर्माण झाला. मात्र, अखेरीस आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल व बीसीसीआयने सर्व प्रकरणावर निकाल देत, संघाला आगामी हंगामात खेळण्याची परवानगी दिली.
हे खेळाडू केले ड्राफ्ट
आयपीएल २०२२ पूर्वी लखनऊ व अहमदाबाद फ्रॅंचाईजींना प्रत्येकी तीन खेळाडू ड्राफ्ट करण्याची परवानगी देण्यात आलेली. अहमदाबादने भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या व अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान यांना प्रत्येकी १५ कोटी रुपये देत आपल्या ताफ्यात सामील केले. तर, भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिलला ८ कोटी रुपये देत आपल्या संघाचा भाग बनवले. भारताला २०११ वन डे विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन अहमदाबाद टायटन्सचे मार्गदर्शक असतील. तर, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. इंग्लंडचे माजी सलामीवीर विक्रम सोलंकी संघाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट म्हणून काम पाहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
…नाहीतर दिल्ली कसोटीत १० विकेट्स कुंबळेसाठी ठरलं असतं स्वप्न
गडी बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजचे हटके सेलिब्रेशन सोशल मीडियावर होत आहे व्हायरल – व्हिडिओ
‘असा’ आहे अंडर १९ विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचा भविष्यातील ‘मास्टर प्लॅन’, स्वतः केला खुलासा