इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. एक आठवड्यापूर्वी भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या अष्टपैलू दीपक हुडा याच्यावर देखील मोठी बोली लागलेली पाहायला मिळाली.
दीपक हुडा यांच्यासाठी या लिलावात मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स व सनरायझर्स हैदराबाद या संघांनी त्याच्यावर मोठी बोली लावली. मात्र, आयपीएलमधील नवी फ्रॅंचायजी असलेल्या लखनऊ सुपरजायंट्सने अखेरीस त्याला ५ कोटी ७५ लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. विशेष म्हणजे त्याने भारतासाठी पदार्पण केल्याने एक दिवस आधीच त्याची बेस प्राईस ४० लाख रुपयांपासून ७५ लाख अशी झाली होती.
मागील वर्षी देशांतर्गत हंगामात बडोदा संघातून निलंबित केल्यानंतर त्याने राजस्थान संघासाठी खेळण्यास सुरुवात केली होती. आयपीएलमध्ये पंजाब किंग्स व देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली. वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात त्याने पहिल्या सामन्यात नाबाद खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच, वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी टी२० मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-