इंडियन प्रीमीयर लीग २०२२ स्पर्धा (IPL 2022) नेहमीपेक्षा वेगळी होणार आहे. या हंगामापासून आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स आणि अहमदाबाद टायटन्स हे दोन नवे संघ सामील होत आहे. त्यामुळे यावेळी १० संघांमध्ये स्पर्धेदरम्यान तर काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहेच, पण त्याआधी होणाऱ्या लिलावातही खेळाडूंना आपल्या संघात खेळण्यासाठी चूरस पाहायला मिळेल. दरम्यान, प्रत्येक संघांनी आयपीएल २०२२ आधी होणाऱ्या लिलावासाठी तयारी सुरू केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघही काही खेळाडूंवर नजर ठेवून आहे.
आयपीएल २०२२ चा लिलाव (IPL Auction 2022) १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे पार पडणार आहे. हा मेगा लिलाव असणार आहे, त्यामुळे लिलावातून सर्वच संघ आगामी हंगामासाठी योग्य संघबांधणी करण्याच्या प्रयत्नात असतील. हा लिलाव रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी (Royal Challengers Bangalore) देखील महत्त्वाचा असणार आहे. कारण, विराट कोहलीने नेतृत्त्वाची जबाबदारी सोडली असून एबी डिविलियर्स देखील निवृत्त झाला आहे.
या लिलावासाठी आरसीबीकडे ५७ कोटी रुपये खर्च करण्यासाठी आहेत. तसेच माध्यमांतील वृत्तानुसार आरसीबी या लिलावातून वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू जेसन होल्डर (Jason Holder) याला आपल्या संघात सामील करून घेऊ शकतात. तसेच ते भारतीय फलंदाज अंबाती रायडू (Ambati Rayudu) आणि रियान पराग (Riyan Parag) यांच्यावरही नजर ठेवून असतील.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आरसीबी (RCB) जेसन होल्डरसाठी १२ कोटी, अंबाती रायडूसाठी ८ कोटी आणि रियान परागसाठी ७ कोटी खर्च करण्याची शक्यता आहे. तसेच या तीन खेळाडूंमध्ये संघ जवळपास २७ कोटी रुपये खर्च करू शकतात. त्यानंतर उर्वरित पैशातून अन्य खेळाडू खरेदी करून संघ तयार करू शकतात.
होल्डर गेल्यावर्षी सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला होता. तसेच तो सध्याच्या क्रिकेट विश्वातील एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. तसेच अंबाती रायडूने आत्तापर्यंत खेळाडू म्हणून ५ वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. त्याने २०१३, २०१५ आणि २०१७ या तीन वर्षी मुंबी इंडियन्सकडून आणि २०१८ व २०२१ या दोन वर्षी चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल विजेतेपद मिळवले आहे. याशिवाय पराग २०१९ पासून राजस्थान रॉयल्सचा भाग होता. तो अष्टपैलू खेळाडू आहे.
आयपीएल २०२२ हंगामासाठी आरसीबीने याआधीच विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या तीन खेळाडूंना संघात कायम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हरभजन म्हणतोय,’ अनिल भाई तुम्ही खूप लालची आहात’; वाचा संपूर्ण प्रकरण
U19 विश्वचषक गाजवल्यानंतरही ‘त्या’ दोघा दुर्दैवी गोलंदाजांची कारकीर्द बहरलीच नाही
भारतातील ‘षटकार किंग’ म्हणून धोनीचे राज्य होणार खालसा, रोहितला अव्वल क्रमांकावर जाण्याची संधी