इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. बंगळुरूमध्ये झालेल्या या लिलावात दुसरे सत्र १२ फेब्रुवारीला फलंदाजांचे पार पडले. या लिलावात मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना देखील सहभागी होता. मात्र, यावेळी त्याच्यावर पहिल्या फेरीत कोणीही पसंती दाखवली नाही.
विशेष म्हणजे २००८ पासून रैना ज्या संघाचा भाग होता, त्या चेन्नई सुपर किंग्सने देखील त्याच्यावर बोली लावली नाही. त्यामुळे तो पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला. आता दुसऱ्या फेरीत जर त्याचे नाव पुन्हा आले, तर त्याच्यावर बोली लागणार का हे पाहावे लागेल.
सुरेश रैनाची या लिलावासाठी २ कोटी ही मुळ किंमत होती. मात्र, त्याच्या या मुळ किंमतीवरही बोली लावण्यास कोणी रस दाखवला नाही. रैनाला या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने संघातून मुक्त केले होते. गेले अनेकवर्षे रैना चेन्नईसाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता. तसेच त्यांचा सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू होता.
आयपीएलमध्ये रैना २००८ ते २०१५ आणि २०१८ ते २०२१ पर्यंत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. तर २०१६ आणि २०१७ साली तो गुजरात लायन्स संघाचा भाग होता. त्याने २०५ आयपीएल सामने आत्तापर्यंत खेळले असून ५५२८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १ शतक आणि ३९ अर्धशतके केली आहेत.
आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या सत्रात केवळ रैनाच नाही, तर स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड मिलर, शाकिब अल हसन हे दिग्गज खेळाडूही अनसोल्ड राहिले आहेत.