इंडियन प्रीमीयर लीगचा १५ हंगाम यावर्षी होणार आहे. हा हंगाम वेगळा असणार आहे. कारण, या हंगामापासून गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे नवे संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे लिलावात हे दोन्ही संघही जुन्या ८ संघांसह सहभागी झाले होते. यामुळे एकूण १० संघांमध्ये खेळाडूंच्या खरेदीसाठी चांगलीच चूरस पाहायला मिळाली. या लिलावातील स्टार खेळाडूंमध्ये ट्रेंट बोल्टचाही समावेश होता. त्यालाही संघात घेण्यासाठी अनेक संघ उत्सुक असल्याचे दिसले.
बोल्ट गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याने मुंबईसाठी चांगली कामगिरी देखील केली. मात्र, हा मेगा लिलाव असल्याने मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल २०२२ लिलावापूर्वी मुक्त केले. त्याचमुळे बोल्ट लिलावात सामील झाला होता.
लिलावासाठी २ कोटी रुपयांची मुळ किंमत असलेल्या ट्रेंट बोल्टसाठी सुरुवातील राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघात चुरस पाहायला मिळाली. पण नंतर मुंबई इंडियन्सने देखील बोल्टमध्ये पसंती दाखवल्याने त्यांनीही त्याच्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. पण, अखेर राजस्थान संघाने ८ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात त्याला सामील करून घेतले.
बोल्टने ६२ आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ७६ विकेट्स घेतल्या आहेत.