कोरोना विषाणूमुळे आयपीएलच्या २०२० पुढे टाकण्यात आले होते. परंतु, आता ही स्पर्धा युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाईल. या आयपीएल मोसमासाठी डिसेंबर२०१९मध्ये झालेल्या लिलावामध्ये संघमालकांनी खेळाडूंवर बरेच पैसे खर्च केले आणि त्यांचे संघ नेहमीप्रमाणेच मजबूत बनले.
आता ते खेळाडू आयपीएलच्या १३ व्या सत्रात कसे कामगिरी करतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. आयपीएलच्या इतिहासाकडे पाहिलं तर, कधीकधी संघ आणि संघमालक खेळाडूवर बरेच पैसे खर्च करतात आणि त्यांचा संघ मजबूत बनवतात, परंतु असे बरेच खेळाडू आहेत जे संघाच्या अपेक्षांनुसार चांगली कामगीरी करू शकले नाहीत.
तर, या लेखामध्ये त्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांना संघमालकांनी प्रचंड रक्कम देऊन विकत घेतले होते, परंतु ते हंगामात पूर्णपणे फ्लॉप झाले होते, ज्याचा परिणाम संघाला सहन करावा लागला.
५ खेळाडू ज्यांना लिलावा दरम्यान मोठी रक्कम मिळाली पण झाले आयपीएमध्ये फ्लॉप…
१- जयदेव उनाडकट (Jaydev Unadka)
गेल्या तीन आयपीएल हंगामात डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट लिलावाच्या वेळी बर्याचदा चर्चेत होता. खरं तर, आयपीएल २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला ११.५ कोटी रुपयांची मोठी किंमत देऊन विकत घेतले, पण त्याची अत्यंत निराशाजनक कामगिरी संपूर्ण हंगामात दिसून आली. संघाला उनाडकटकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्याला संघाच्या अपेक्षांची पूर्तता करता आली नाही.
२०१८ मध्ये जयदेव उनादकटला १५ सामने खेळण्याची संधी मिळाली पण त्या सामन्यांत तो फक्त ११ बळी मिळवू शकला. या १५ सामन्यांमध्ये त्याची सरासरी ४४.१८ अशी निराशाजनक होती. असे असूनही राजस्थान रॉयल्स संघने पुन्हा २०१९ मध्ये उनाडकटवर पैसे लावले आणि त्यावेळी त्याला ८.४० कोटी रुपये देऊन खरेदी केले.
पण त्या मोसमातही सौराष्ट्रच्या या कर्णधाराने सर्वांनाच निराश केले आणि १२ सामन्यांत अवघे १० गडी बाद केले. आयपीएल २०२० च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा उनाडकाटला ३ कोटीमध्ये विकत घेतले आणि यावेळी तरी तो जबरदस्त कामगिरी करून चाहत्यांच माने जिंकतो का ते पाहणे रंजक ठरेल.
२. शेन वॉटसन (Shane Watson)
आयपीएल २०१५ मध्ये राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षाची बंदी घालल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २०१६ च्या लिलावात ९.५ कोटींच्या मोठ्या किंमतीसह शेन वॉटसनला त्यांच्या संघात सामील करून घेतले.
आरसीबीच्या संघाला आणि चाहत्यांना वॉटसनकडून मोठ्या आशा होत्या, ९.५ कोटी एवढी मोठी रक्कम घेऊनही वॉटसनला आपल्या बॅटची जादू दाखवता आली नाही आणि गोलंदाजीमध्येही तो आश्चर्यकारक काहीही करू शकला नाही. संपूर्ण मोसमात त्याने १६ सामने खेळले आणि १३.७७ च्या सरासरीने केवळ १७९ धावा केल्या, तर गोलंदाज म्हणून त्याच्या खात्यात २० विकेट्स आल्या.
वॉटसनने अजूनही या हंगामात चांगली कामगिरी बजावली, त्यातच २०१७ मध्येही त्याने सर्वांनाच निराश केले. संपूर्ण मोसमात वॉटसनने ८ सामन्यांत अवघ्या ७१ धावा केल्या आणि फक्त पाच विकेट घेतल्या. त्यानंतर २०१८ ला चेन्नई सुुपर किंग्स संघात वॉट्सन सामील झाला. त्याने चेन्नईकडून चांगली कामगिरी केली.
३. युवराज सिंग (Yuvraj Singh)
भारतीय संघाचा मॅच विनर खेळाडू असलेला युवराज सिंग आयपीएल लिलाव २०१५ मध्ये सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडू होता. या माजी अनुभवी अष्टपैलू खेळाडूला दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल) यांनी पूर्ण १६ कोटींमध्ये खरेदी केले.
दिल्ली संघाने युवराजसिंगकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली होती, पण युवीला काही खास करता आले नाही. त्याला संपूर्ण मोसमात सर्व १४ सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने फलंदाजीच्या २० पेक्षा कमी सरासरीने आणि केवळ ११८.५७ च्या स्ट्राइक रेटसह फक्त २४९ धावा केल्या. गोलंदाज म्हणूनही तो १४ सामन्यात फक्त एक विकेट घेऊ शकला. अशा खराब कामगिरीनंतर दिल्लीने पुढच्या मोसमात त्याला आपल्या संघातून बाहेरचा रस्ता दाखविला.
त्यानंतर युवराज सिंग सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला. २०१६ मध्ये हैदराबादकडून आयपीएल जिंकणार्या युवीने गेल्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली होती.
४. बेन स्टोक्स (Ben Stokes)
सध्याच्या पहिल्या क्रमांकाच्या कसोटी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचेही नाव या यादीमध्ये समाविष्ट आहे. २०१७ मध्ये राइझिंग पुणे सुपरजायंटकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्सने आयपीएल२०१८ च्या लिलावात १२.५ कोटीला आपल्या संघात घेतले.
पण स्टोक्सवर साडे बारा कोटी खर्च केलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला काही उपयोग झाला नाही. खरं तर, संपूर्ण हंगामात, स्टोक्सने १३ सामने खेळले आणि १६.३३ च्या खराब सरासरीने केवळ १९६ धावा केल्या. फलंदाजीसह तो गोलंदाजीतही फ्लॉप ठरला. त्याने १३ सामन्यांत एकूण ३७ षटकांची गोलंदाजी केली, त्यात त्याने फक्त ८ गडी बाद केले.
संघानेही त्याला २०१९ साठी टिकवून ठेवले होते, परंतु यावेळीसुद्धा स्टोक्स त्याच्या किंमतीनुसार खेळ दाखवू शकला नाही. २०१९ मधील ९ सामन्यात २०.५० च्या सरासरीने फक्त १२३ धावा केल्या आणि गोलंदाजीत त्याने केवळ ६ विकेट घेऊ शकला. आता या हंगामात राजस्थान पुन्हा एकदा बेन स्टोक्सकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करेल.
५. अँड्र्यू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff)
२००९ च्या आयपीएलच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने अँड्र्यू फ्लिंटॉफला साडेसात कोटी देऊन आपल्या संघात घेतले होते आणि त्या मोसमात संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यावेळी अँड्र्यू फ्लिंटॉफ त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात होता, परंतु मैदानावर त्याचा ज्वलंतपणा अद्याप कायम होता. पहिल्या तीन सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने त्याला संधी दिली पण तो पूर्ण फ्लॉप ठरला.
अँड्र्यू फ्लिंटॉफने तीन सामन्यांमध्ये ३१ च्या सरासरीने आणि ११७ च्या स्ट्राइक रेटसह केवळ ६२ धावा केल्या आणि ५२.५० च्या अत्यंत खराब सरासरीने केवळ दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या तीन सामन्यांनंतर त्याला उर्वरित सामन्यांत संघातून वगळण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सचिनला त्रिफळाचीत करणारा माझा तो चेंडू वॉर्नपेक्षाही भारी,’ पाहा कोण म्हणतंय…
वीरेंद्र सेहवागच्या ‘या’ शतकाला झाले १८ वर्षे पूर्ण; शेअर केला खास व्हिडिओ
-विराट कोहलीच्या लग्नात झाली होती धोनीच्या रिटायरमेंटवर चर्चा
ट्रेंडिंग लेख –
५ असे खेळाडू ज्यांना आयपीएलच्या लिलावात मिळाली कमी रक्कम, परंतु संघासाठी ठरले मॅच विनर
‘जेंटल जायंट’ या नावाने प्रसिद्ध झालेला अँगस फ्रेझर
रणजी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघात निवड झालेले दिलीप सरदेसाई