भारतात क्रिकेटला खेळ नाही, तर एक भावना म्हटले जाते. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात क्रिकेट चाहते पाहायला मिळतात. यातील काही गल्ली क्रिकेटचे बहाद्दरही असतात, जे त्यांच्या आवडत्या खेळाडूंची ऍक्शन कॉपी करत असतात. अशाच एका चाहत्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो चाहता भारतीय क्रिकेट संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची गोलंदाजी ऍक्शन कॉपी करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील चाहत्याचे नाव उबेद खान (Ubaid Khan) असे आहे. या व्हिडिओत उबेद कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या गोलंदाजी ऍक्शनची कॉपी करत आहे. उबेदने या व्हिडिओत कुलदीपची एकदम योग्य पद्धतीने नक्कल केली आहे. एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले होते की, “व्हिडिओ कुलदीप यादवपर्यंत पोहोचला पाहिजे.” उबेदचा हा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कुलदीप यादवलाही टॅग करण्यात आले आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही चाहत्यांनी म्हटले आहे की, “या चाहत्याने कुलदीपची हुबेहूब नक्कल केली आहे. तसेच, त्याच्या प्रतिभेला ओळख मिळाली पाहिजे.” दुसरीकडे, काहींनी असे म्हटले आहे की, “भारतात अशाप्रकारच्या प्रतिभेची कमतरता नाहीये आणि प्रत्येक गल्लीत असा एक खेळाडू आहे, ज्याला भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे.”
खरं तर, कुलदीप यादव सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. चट्टोग्राम येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला भारतीय ताफ्यात सामील केले आहे. या सामन्यात त्याने शानदार कामगिरी केली आहे. भारताच्या पहिल्या डावात त्याने शानदार फलंदाजी केली. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 40 धावा केल्या आहेत.
तसेच, त्याने बांगलादेशच्या पहिल्या डावादरम्यान गोलंदाजी करताना 4 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने 10 षटकांच्या गोलंदाजीत 33 धावा दिल्या आणि मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, नुरुल हसन आणि तैजुल इस्लाम यांची विकेट घेतली. त्याच्या कामगिरीमुळे भारतीय संघाने सामन्यावर चांगली पकड बनवली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेश संघ 133 धावांवर 8 विकेट्स गमावत आव्हानापासून 271 धावांनी मागे आहे. (ipl franchise delhi capitals share video fan imitating kuldeep yadav bowling action)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्लेसिसने उकरून काढले बॉल टेम्परिंग प्रकरण! स्मिथवर लावले गंभीर आरोप
मोठी बातमी! भारतीय दिग्गजाने ‘या’ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, बोर्डाने दिली माहिती






