---Advertisement---

आयपीएल 2020 : अंतिम सामन्यात दिल्लीला धूळ चारत मुंबईकडून पाचव्यांदा विजेतेपदाला गवसणी

On: मंगळवार, नोव्हेंबर 10, 2020 10:51 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० मध्ये मंगळवरी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला. हे मुंबईचे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले. मुंबई इंडियन्सने याआधी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ ला आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. याआधी कोणत्याच संघाला ५ वेळा विजेतेपद मिळवता आलेले नाही.

अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सने १५७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबई इंडियन्सने १८.४ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने ५१ चेंडूत ६८ धावा करत अर्धशतकी खेळी केली. तर इशान किशनने नाबाद ३३ धावा केल्या. त्याचबरोबर क्विंटन डिकॉकने २०, सुर्यकुमार यादवने १९ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयात खारीचा वाटा उचलला.

दिल्लीकडून गोलंदाजी करताना एन्रीच नॉर्किएने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर कागिसो रबाडा आणि मार्कस स्टॉयनिसने प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ७ विकेट्स गमावत १५६ धावा केल्या होत्या. त्यांची सुरुवात खराब झाली होती. सलामीला आलेला मार्कस स्टॉयनिस शुन्यावरच बाद झाला. मात्र नंतर रिषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दिल्लीचा डाव सांभाळताना चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. तसेच या दोघांनी अर्धशतकेही पूर्ण केली. पंतने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार मारत ५६ धावा केल्या. तर अय्यरने ५० चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. त्यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा पार करता आला नाही.

मुंबईकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर नॅथन कुल्टर नाईलने २ विकेट्स आणि जयंत यादवने १ विकेट घेतली.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---