२०२० आयपीएलचे बिगुल लिलावापूर्वीच वाजले होते. खरंतर, २०१९ संपल्यानंतर बऱ्याच संघांनी पुढच्या हंगामासाठी तयारी सुरू केली होती. यात किंग्स इलेव्हन पंजाब आघाडीवर होती. लिलावात मॅक्सवेल, निशाम, कॉट्रेल यासारखे आंतरराष्ट्रीय दिग्गज मोठ्या मोठ्या किमती घेऊन पंजाबचा संघाचे भाग झाले. तर, प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे, जोंटी रोड्स, वसीम जाफर, अँडी फ्लॉवर हे नामांकित प्रशिक्षक संघासोबत जोडले गेले. संघाचे कर्णधारपद भारताचा सुपरस्टार के एल राहुलच्या हाती सोपवण्यात आले. एकूणच संघाला नवीन रूप देण्याचे काम व्यवस्थापनाने केले.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ पंजाब राज्याचे प्रतिनिधित्व करत असला तरी संघातील बरेचसे खेळाडू कर्नाटकचे आहेत. मयंक अगरवाल, के एल राहुल व करूण नायर सारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू आधीपासून संघात असताना, प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कर्नाटकच्याच असलेल्या अनिल कुंबळे यांनी के. गौथम व जगदीशा सुचिथ यांना संघाच्या रणनीतीचा भाग बनवून लिलावापूर्वी ट्रेड करत पंजाबच्या संघात सामील करून घेतले. यातीलच जगदीशा सुचिथ याच्या विषयी आज आपण जाणून घेऊया.
टिपू सुलतानसाठी प्रसिद्ध असणारे म्हैसूर शहर, जवागल श्रीनाथ क्रिकेट खेळू लागल्यानंतर त्याच्या नावाने ओळखले जाऊ लागले. श्रीनाथला म्हैसूर एक्स्प्रेस हे टोपणनाव सुद्धा दिले गेले. म्हैसूरसारख्या छोट्या शहराला क्रिकेटचा ज्वर मात्र चांगलाच चढला होता. त्यात लहान सुचिथला देखील क्रिकेट आवडू लागले. त्याच्या वडिलांन त्याला म्हैसूरमधील सर्वात मोठ्या नायडू जिमखाना या क्लबमध्ये दाखल केले.
वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्याची कर्नाटकच्या १३ वर्षाखालील संघात निवड झाली. तेव्हापासून तो कर्नाटकच्या प्रत्येक वयोगट संघाचा सदस्य राहिला आहे. मात्र, यादरम्यान त्याला रोज म्हैसूर ते बेंगलोर असा प्रवास करावा लागत.
सुचिथला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली ती २०१४-१५ चहा देशांतर्गत क्रिकेट हंगामात. त्या वर्षी त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले. विजय हजारे ट्रॉफी तसेच रणजी ट्रॉफी गाजवत असतानाच, २०१५ च्या आयपीएलसाठी त्याची निवड मुंबई इंडियन्स संघात झाली. याच हंगामात मुंबईच्या संघामध्ये हार्दिक पांड्याचा समावेश करण्यात आला होता. पांड्या-सुचिथ या युवा जोडीने भल्याभल्या टी२० दिग्गजांना नाकीनऊ आणत स्पर्धा गाजवली. पांड्याने आपल्या आक्रमक फलंदाजीचे पाणी अनेकांना पाजले. दुसरीकडे सुचिथने स्पर्धेत १३ सामने खेळत १० बळी आपल्या नावे केले होते. गौतम गंभीर, ग्लेन मॅक्सवेल, जेपी डुमिनी, रवींद्र जडेजा, शिखर धवन हे दिग्गज खेळाडू सूचिथच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले होते. त्याच वर्षी, कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये बिजापूर बुल्स विरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतकी तडाखा दिला.
२०१६ आयपीएलमध्ये एक सामना तर २०१७ च्या आयपीएलमध्ये एकही संधी न मिळाल्याने सुचित अत्यंत दुःखी झाला होता. याविषयी सांगताना सुचिथ म्हणाला होता,
“२०१५ च्या हंगामात चांगली कामगिरी करून देखील पुढच्या हंगामात मला अवघा एक सामना खेळायला मिळाला. कृणाल पांड्यामुळे मला सतत डावलले गेले. मात्र, मी अजून संधी मिळविण्यास पात्र होतो. मुंबई संघात संधी मिळत नसल्याने, मी संघाचे संचालक राहुल संघवी यांना म्हटलेलो, मला दिल्ली डेरडेव्हिल्स सोबत ट्रेड करा. कारण, दिल्ली संघाने मला त्यांच्या संघात सामील करून घेण्यात रस दाखवला होता. पण, संघवी यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. मुंबई व्यवस्थापनाने माझा अजिबात योग्य वापर करून घेतला नाही.”
२०१७ व २०१८ ही दोन वर्ष सुचिथसाठी अत्यंत वाईट गेली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी सरासरी होत होती. यातच, सलग दोन वर्ष तो आयपीएलच्या लिलावात विकला गेला नाही. २०१९ च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा हर्षल पटेल दुखापतग्रस्त झाल्याने दिल्ली व्यवस्थापनाने सुचिथला संघात स्थान दिले. दिल्लीकडून ही त्याला अवघा एक सामना खेळायची संधी मिळाली.
युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून रंगणाऱ्या तेराव्या आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळणाऱ्या, ‘गँग्स ऑफ कर्नाटक’ चा भाग असलेल्या सुचिथला अधिकाधिक संधी मिळाल्यास तो पंजाबला पहिले विजेतेपद मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करेल.
ट्रेंडिंग लेख –
टीम इंडियात हक्काची जागा न मिळालेला विदर्भाचा धडाकेबाज ढाण्या वाघ
आयपीएलमध्ये पर्पल कॅपचे मानकरी ठरलेले ४ भारतीय गोलंदाज
आरसीबीला पहिल्यांदा आयपीएल विजेता बनवण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात हे ३ परदेशी खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरचा हा खेळाडू ठोकू शकतो आयपीएलमध्ये द्विशतक, पहा कोणी केलाय हा दावा
कोरोनामुळे क्रिकेटरवर आली वाईट वेळ, चेंडू सापडायला गेला अन्…
टीममधील एक सदस्य सापडला कोरोना पाॅझिटीव्ह, अर्ध्यातच सोडावा लागला क्रिकेटचा सामना