आयपीएल 2024 मध्ये सूर्यकुमार यादवनं हंगामातील आपला दुसरा सामना (11 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळला. या सामन्यात त्यानं 273.68 च्या स्ट्राइक रेटनं 52 धावांची चांगली खेळी केली. आयपीएल 2024 च्या हंगामात सूर्यकुमारनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आपल्या प्रथम सामना खेळला होता. या सामन्यात त्याला शून्यावर परतावं लागलं होतं. परंतु दुसऱ्या सामन्यात त्यानं आरसीबी विरुद्ध आक्रमक फलंदाजी करुन मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या या खेळीनंतर काही विक्रमही मोडले आहेत.
सूर्याच्या नावावर विक्रम आणि मुंबई इंडियन्सलाही फायदा
सूर्यकुमार यादवनं आरसीबी विरुद्ध खेळताना अवघ्या 17 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ईशान किशननं सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध (2021) केवळ 16 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. अशाप्रकारे सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून खेळताना सर्वात वेगवान अर्धशतक मारणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सनं आणखी एक विक्रम रचला. टीमनं आयपीएलच्या इतिहासात 190 किंवा त्यापेक्षा जास्त लक्ष्याचा चौथ्यांदा यशस्वी पाठलाग केला. मुंबईनं आयपीएल 2014 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध 190 धावांचा पाठलाग करताना 32 चेंडू राखून विजय मिळवला होता. आता आयपीएल 2024 मध्ये आरसीबी विरुद्धच्या सामन्यात त्यांनी 197 धावांचं लक्ष्य गाठताना 27 चेंडू राखून विजय मिळवला. आयपीएलच्या मागील हंगामात (2023) मुंबईनं आरसीबी विरुद्ध मोठा विजय मिळवला होता. त्यांनी 200 धावांचं लक्ष्य गाठताना 21 चेंडू राखून विजय मिळवला होता.
वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा आरसीबी विरुद्ध सलग 6वा विजय
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा हा आरसीबी विरुद्ध सलग 6वा विजय आहे. आयपीएलमध्ये आरसीबीनं मुंबईविरुद्ध आपला शेवटचा सामना 2015 साली जिंकला होता.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, आयपीएल 2024 चा 25वा सामना (11 एप्रिल) मुंबई आणि बंगळुरू यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबीनं 8 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघानं 3 विकेट्स गमावून 15.3 षटकात जबरदस्त विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या
आरसीबीविरुद्ध 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज, जसप्रीत बुमराहनं मोडला 9 वर्ष जुना विक्रम
नाव मोठं, लक्षण खोटं! ‘बिग शो’ मॅक्सवेलचा आयपीएलमधील फ्लॉप शो जारीच