इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन येत्या एप्रिल-मे महिन्यात केले जाणार आहे. या हंगामासाठी सगळ्याच संघांनी कसून तयारी सुरु केली आहे. त्यातच गेल्या तेरा हंगामांपासून या स्पर्धेचा अविभाज्य घटक असलेल्या पंजाबच्या संघाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने आपले नाव बदलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता यापुढील हंगामांसाठी पंजाबच्या संघाचे नाव ‘पंजाब किंग्ज’ असे असणार आहे. याबाबत संघमालकांनी बीसीसीआयला माहिती दिली असून नव्या नावाला मंजुरी देखील मिळाल्याचे वृत्त आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार पंजाबच्या संघाच्या नवीन रूपाचे अनावरण मुंबईत करण्याचा संघमालकांचा मानस आहे. हे अनावरण मुंबईत होण्याची शक्यता असून चेन्नईतील लिलाव प्रक्रियेपूर्वी त्याचे आयोजन केले जाईल. अर्थात किंग्स इलेव्हन पंजाबच्या कुठल्याही अधिकाऱ्याने याबाबत अधिकृत घोषणा केली नाहिये. मात्र ही घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
पंजाबच्या संघाची मालकी मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि करण पॉल यांच्याकडे आहे. आयपीएलच्या मागील तेराही हंगामात हा संघ सहभागी झाला असला तरी त्यांना एकदाही विजेतेपद पटकावता आले नाहिये. केवळ एकदा अंतिम फेरी गाठण्यात त्यांना यश मिळाले आहे. आणि एका हंगामात त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.
त्यामुळे येत्या हंगामात नाव बदलण्यासह हा इतिहास बदलण्याचाही पंजाबचा संघ प्रयत्न करेल. केएल राहुलला आगामी हंगामासाठी पंजाबने कर्णधारपदी कायम ठेवले असून येत्या लिलावाद्वारे मजबूत संघबांधणी करण्याचे उद्दिष्ट पंजाबचे आहे.
महत्वाच्या बातम्या:
खाली डोके वर पाय..! भर सामन्यात बेन स्टोक्सची अतरंगी चाल, पाहून आठवतील बालपणीच्या करामती
चांगली खेळी केल्यानंतरही विराट सापडला वादात,स्टीव्ह स्मिथशी केली तुलना
चेन्नईचा सुपर किंग! लाजवाब शतकाने माजी खेळाडूंनीही केला अश्विनला सलाम, ट्विटरवर वाहतोय प्रशंसेचा पूर