चेन्नई। आज आयपपीएल २०१८ मधील पाचवा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रात्री ८ वाजता खेळवण्यात येणार आहे.
हा सामना चेन्नईला होणार का याबद्दल शंका व्यक्त होत होती. कावेरी पाणी प्रश्न तामिळनाडूमध्ये बराच पेट घेत आहे. यामुळे हा सामना दुसरीकडे हलवण्याची किंवा रद्द करण्याची मागणी झाली होती. तसेच अशी मागणी जेष्ठ अभिनेते राजनीकांत आणि कमल हसननेही केली होती.
यामुळेच या सामन्याबद्दल साशंकता होती. पण आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्लांनी हा सामना चेन्नईमध्येच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
याबद्दल ते एएनआयशी बोलताना म्हणाले, चेन्नईला होणारा सामना दुसरीकडे हलवला जाणार नाही. १० एप्रिल(आज) ला होणारा सामना चेन्नईमध्येच होईल. आम्ही अधिकृत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी आम्हाला खात्री दिली आहे की ते या सामन्यासाठी पूर्ण सुरक्षा पुरवली जाईल. त्यामुळे हा सामना चेन्नईमध्ये होईल आणि हा सामना दुसरीकडे हलवण्याची कोणतीही योजना नाही. मी विनंती करतो की आयपीएलला राजकीय वादांमध्ये ओढू नका.”
चेन्नईमध्ये आज जवळ जवळ २ वर्षांनी क्रिकेटचा सामना होत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्सही २ वर्षांच्या पुनरागमानंतर पहिल्यांदाच घराच्या मैदानावर सामना खेळणार आहेत.
या सामन्यासाठी तब्बल ४००० पोलिसांचा फौजफाटा मैदानाच्या आसपास दक्षता घेणार आहे.
चेन्नई संघाच्या सराव सामन्यासाठी जवळ जवळ १०,००० प्रेक्षकांनी उपस्थिती नोंदवली होती. त्यामुळे आजच्या सामन्यासाठीही मोठ्या संख्येत प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.