इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाची उत्सुकता आता क्रिकेट विश्वात दिसून येत आहे. हा हंगाम अनेक अर्थांनी वेगळा असणार आहे. आयपीएलच्या या १५ व्या हंगामापासून गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन नवे संघ जोडले जाणार आहेत. त्यामुळे या हंगामापासून आयपीएलमध्ये १० संघ खेळताना दिसणार आहे.
आयपीएलच्या १५ व्या हंगामाला (IPL 2022) येत्या २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये या हंगामासाठी लिलाव पार पडला होता. हा मेगा लिलाव असल्याने प्रत्येक संघ जवळपास नव्याने बांधण्यात आला आहे. तसेच अनेक संघांना नवे कर्णधारही लाभले आहेत. काहीदिवसांपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने फाफ डू प्लेसिसला आपल्या संघाचा नवा कर्णधार म्हणून जाहिर केले. त्यामुळे आता सर्व १० संघांच्या कर्णधारांची नावे स्पष्ट झाली आहेत.
डू प्लेसिस सर्वात स्वस्त कर्णधार
आयपीएल २०२२ साठी १० संघांच्या कर्णधारांना (IPL Captain) मिळणाऱ्या मानधनाचा विचार केला, तर आरसीबीला सर्वात स्वस्तात त्यांचा कर्णधार मिळाला आहे. आरसीबीने डू प्लेसिसला (Faf du Plessis) लिलावात ७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. तसेच यंदा सर्वाधिक पैसे घेणाऱ्या कर्णधारांबद्दल बोलायचे झाले तर केएल राहुलचे नाव अव्वल क्रमांकावर आहे.
लखनऊ सुपरजायंट्स या नव्या संघाचे केएल राहुल (KL Rahul) नेतृत्त्व करणार आहे. त्याला १७ कोटी रुपयांमध्ये लखनऊ सुपरजायंट्सने आपल्या संघात सामील केले आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२२ मधील सर्वात महागडा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलमधील सर्वात महागडा कर्णधार होता. त्याला आरसीबीकडून १७ कोटी मिळायचे, पण आता तो कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे सध्या आयपीएलमधील महागड्या कर्णधाराचा विक्रम केएल राहुलकडे जातो.
आयपीएल २०२२ मधील सर्वात महागड्या कर्णधारांमध्ये केएल राहुलपाठोपाठ रोहित शर्मा आणि रिषभ पंत आहेत. रोहितला मुंबई इंडियन्सने आणि रिषभला दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी १६ कोटी रुपयांमध्ये कायम केले होते. त्याचबरोबर हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार असून फ्रँचायझी त्याला १५ कोटी रुपये देणार आहे, तर सनरायझर्स हैदराबादने केन विलियम्सनला १४ कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले असून तो यंदा संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसाठी देखील फ्रँचायझी १४ कोटी रुपये मोजणार आहे.
तसेच त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर असून त्याच्यासाठी फ्रँचायझी १२.२५ कोटी रुपये मोजणार आहे. यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी आहे. त्याला चेन्नईने १२ कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले आहे. तसेच पंजाब किंग्स संघाचा कर्णधार मयंक अगरवालसाठीही १२ कोटी रुपये फ्रँचायझी मोजणार आहे.
पुणे-मुंबईत सामने
आयपीएल २०२२ हंगामातील साखळी फेरीचे ७० सामने मुंबई आणि पुणे या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर, तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हे सामने खेळवले जाणार आहेत. या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार असून २९ मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
आयपीएल संघांचे कर्णधार आणि त्यांचे मानधन
१. लखनऊ सुपरजायंट्स: केएल राहुल – १७ कोटी
२. मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा: १६ कोटी
३. दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत: १६ कोटी
४. गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्या – १५ कोटी
५. राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन – १४ कोटी
६. सनरायझर्स हैदराबाद: केन विल्यमसन – १४ कोटी!
७. कोलकाता नाईट रायडर्स – श्रेयस अय्यर: १२.२५ कोटी
८. पंजाब किंग्स: मयंक अगरवाल – १२ कोटी
९. चेन्नई सुपर किंग्स – एमएस धोनी: १२ कोटी
१०. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: फाफ डू प्लेसिस – ७ कोटी
महत्त्वाच्या बातम्या –
बंगळुरू कसोटीत ‘सामनावीर’ बनलेल्या श्रेयसने सांगितली मनातली गोष्ट, झोपेतही पाहायचा टेस्टचे स्वप्न
टिक टिक बुम! रोहित आणि बुमराह पोहोचले मुंबईत, ‘पलटण’ने शेअर केला झक्कास व्हिडिओ
सुपर ओव्हरमध्येही फायनलचा निकाल न लागल्यास ‘असा’ ठरणार विजेता, आयपीएल २०२२चे नवे नियम वाचलेत का?