भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने न्यूझीलंडला ३-० ने मात दिली. भारतीय संघ विजयी ठरला असला तरी काही आघाड्यांवर संघाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. भारतीय संघात अशा अनेक समस्या आहेत ज्यांचे निराकरण अद्याप झालेले नाही.
ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाजी त्यापैकीच एक होती. जिथे भारतीय संघाने ३८ चेंडूत ६९ धावा जोडून धमाकेदार सुरुवात केली. मात्र, इतर फलंदाज पुढच्या ५ षटकात ३४ धावाच जोडू शकले. आता दोन माजी दिग्गज खेळाडूंनी भारताच्या याच कमतरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, संघाला काही सल्ले दिले आहेत.
दोन दिग्गजांनी दिली प्रतिक्रिया
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण व न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी यांनी भारताच्या मधल्या फळीविषयी चिंता व्यक्त केली. या दोघांनीही खास करून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्यावर निशाणा साधला. व्हेटोरी म्हणाला,
“रिषभ या मालिकेत आपली जबाबदारी समजून घेण्यात अपयशी ठरला. तो कधी कधी आक्रमक होतो तर कधी अत्यंत सावधगिरीने खेळतो. त्याची हरवलेली लय तो शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.”
इरफान पठाण यानेदेखील मधल्या फळीची समस्या भारतीय संघासाठी उभी राहिली आहे असे म्हटले.
मालिकेत अपयशी ठरला पंत
विश्वचषकात संमिश्र कामगिरी केल्यानंतर रिषभ पंत न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरला. जयपूर येथील पहिल्या सामन्यात १७ धावांची नाबाद मात्र संथ खेळी केली. दुसऱ्या सामन्यातही १२ धावा करू शकला. तिसऱ्या सामन्यात मोठ्या खेळाची संधी असताना तो ४ धावांवर बाद झाला. सध्या ईशान किशन हा यष्टीरक्षक होण्यासाठी त्याच्याशी स्पर्धा करताना दिसत आहे.