मुंबई । 2003 साली वयाच्या 19 वर्षी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने ऍडलेड येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले. आपल्या स्विंग आणि वेगाने साऱ्यांना त्याने प्रभावित केले. इरफानचे पदार्पण भारतासाठी लकी ठरले आणि या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला.
पुढे इरफान पठाणने आपल्या गोलंदाजीचा जलवा कायम ठेवला. अवघ्या 59 सामन्यात 100 बळी घेण्याचा विक्रम त्याने केला. 2006 साली पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळताना हॅट्ट्रिक घेण्याचा कारनामा केला. 2007 साली टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 4 षटकात 16 धावा देत 4 महत्त्वपूर्ण गडी बाद करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा त्याने उचलला. त्याच्या या बहारदार कामगिरीनंतर त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही चमक दाखवणारा इरफान पठाण भारताचा अष्टपैलू खेळाडू बनण्याच्या मार्गावर होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. फॉर्म आणि फिटनेसने त्याला घेरले. त्यामुळे तो संघाबाहेर फेकला गेला. भारतीय संघातील वाढत्या स्पर्धेमुळे त्याला पुनरागमन करणे अवघड होऊ लागले.
इरफान पठाण आपल्या कारकिर्दीविषयी एक संकेतस्थळाशी बोलताना म्हणाला, ” मी भारतीय संघातला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होऊ शकलो असतो. पण मला जास्त संधी भेटली नाही. भारताकडून मी माझा शेवटचा सामना वयाच्या 27 वर्षी खेळलो. लोक मला वयाच्या 35-37 वर्षांपर्यंत क्रिकेट खेळू पाहत होते.”
“वयाच्या 35 व्या वर्षांपर्यंत मी क्रिकेट खेळलो असतो तर आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली असती. पण आता वेळ निघून गेली आहे. मी जितके ही सामने खेळलो तितके मॅच विनर खेळी केल्या आहेत. मी केवळ नव्या चेंडूने विकेट घेऊ शकतो असे नाही चेंडू जुना झाला तरी मी गोलंदाजी करू शकतो. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. जेव्हा तुमची भूमिका बदलते तेव्हा तुमच्या आकड्यातही फरक पडतो. संघ व्यवस्थापनाकडून मला कुठलेच सहकार्य मिळाले नाही.”
इरफान पठाणने त्यांचा शेवटचा सामना 2012 साली टी 20 विश्वचषकात खेळला होता. तसेच श्रीलंकेविरुद्ध ऑगस्ट 2012 ला खेळलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात त्याने पाच गडी बाद केले होते. त्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला आणि संघाबाहेर पडला. इरफान पठाण 2018 पासून जम्मू काश्मीरच्या रणजी संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज असलेला एस श्रीसंत गिरवतोय ‘हे’ धडे
…आणि ‘या’ गोष्टीला वैतागलेल्या सचिनने कर्णधार पदाला ठोकला राम राम
हा निव्वळ वेडेपणा आहे! हार्दिक पंड्याचा व्हिडीओ पाहून बाॅलीवूड अभिनेत्रीची प्रतिक्रीया