भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी (३ डिसेंबर) सुरुवात झाली. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या सामना न्यूझीलंडने अनिर्णीत ठेवला होता. या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात ३२५ धावा करू शकला. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने सामन्याच्या पहिल्या डावात ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने भारताच्या १० विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीसाठी असंख्य चाहत्यांनी त्याचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने देखील एजाज पटेलसाठी एक खास ट्वीट केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
एजाज पटेलने या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे चार आणि दुसऱ्या दिवशी सहा विकेट्स घेतले. त्याच्या एकट्याच्या जोरावर न्यूझीलंडने भारताला दुसऱ्या दिवशी सर्वबाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणार तो तिसरा खेळाडू ठरला आहे. यासाठी त्याचे अनेक दिग्गजांनी कौतुक केले. यामध्ये अनिल कुंबळे, रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, केवीन पीटरसन, ब्रेंडन मॅक्यूलम, वसीम जाफर यांच्यासह इतरही नावांचा समावेश आहे.
भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू इरफान पठानने देखील एजाज पटेलल्या या कामगिरीनंतर एक खास ट्वीट केले. इरफानचे हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, ‘कृपया कोणत्याही भारतीयलाला इतर कोणत्याही देशात जाऊ देऊ नका. सर्वात्तम कोण आहेत हे विचारू नका. दस का दम.’ इरफानच्या या ट्वीटनंतर चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहत्यांनी इरफानचे हे ट्वीट भेदभाव करणारे असल्याचे मत मांडले आहे.
Please don’t let any Indian go to any other country, best don’t even ask them. Dus ka dum 😳 #AjazPatel
— Irfan Pathan (@IrfanPathan) December 4, 2021
दरम्यान, या सामन्याचा विचार करायचा झाल्यास, भारताने पहिल्या दिवशी सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३२५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. न्यूझीलंडच्या फलंदाजीवेळी भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि न्यूझीलंडला दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याआधीच सर्वबाद केले. न्यूझीलंडने त्यांच्या पहिल्या डावात फक्त ६२ धावा केल्या. न्यूझीलंडचा डाव संपल्यानंतर भारत सध्या फलंदाजी करत आहे. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता ६९ धावा केल्या आहेत.