नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये इशान किशन इंडिया सी संघाकडून खेळला होता. त्यानं या स्पर्धेत दोन सामने खेळले, ज्यामध्ये एक शतक झळकवलं. मात्र, दुलीप ट्रॉफीमध्ये शतक झळकावल्यानंतरही इशानला टीम इंडियात संधी मिळण्यासाठी वाट पाहावी लागू शकते. यामागचं कारण काय? हे या बातमीद्वारे समजून घ्या.
सध्या भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडियानं मालिकेतील पहिला सामना जिंकला. आता मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळला जाणार आहे. कसोटी मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. दुलीप ट्रॉफीमध्ये शतक झळकावणाऱ्या इशानला बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु आता समोर आलेल्या अपडेटनुसार, त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.
वास्तविक, इराणी कप 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला जाईल. इराणी चषकासाठी इशान किशनचा ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघात समावेश करण्यात आला आहे. तर संजू सॅमसनला संधी मिळालेली नाही. इराणी कप संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारत आणि बांगलादेश यांच्यात टी20 मालिका सुरू होणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संजू सॅमसनला टीम इंडियात संधी मिळू शकते. संजूनं दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार फलंदाजी करत चार डावात 196 धावा केल्या होत्या. मात्र, त्यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेत संजूची बॅट पूर्णपणे शांत दिसली होती. त्याला मालिकेतील दोन सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्या दोन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झाला.
इशान किशननं नोव्हेंबर 2023 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा टी20 सामना खेळला होता. इशानही त्याच्या शेवटच्या सामन्यात खातं न उघडता बाद झाला होता. अशा परिस्थितीत आता बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत या दोघांपैकी कोणाला संधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
VIDEO : पॅट कमिन्सने सुरू केली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तयारी, नेट्समध्ये जबरदस्त घाम गाळला
वीरेंद्र सेहवागची राजकारणात एंट्री? उघडपणे केला या पक्षाच्या नेत्याचा प्रचार
बीसीसीआयचा अचानक मोठा निर्णय, हे 3 खेळाडू दुसरी कसोटी खेळणार नाहीत