युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे बीसीसीआयनं त्याला करारबद्ध केलं नव्हतं. इशान किशनची दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाल्यानंतर त्याच्या पुनरागमनाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र येथेही त्याचं दुर्दैव आड आलं. इशान किशन दुखापतग्रस्त झाला असून तो दुलीप ट्रॉफीचा सामना सुरू होण्यापूर्वीच बाहेर पडला.
इशान किशननं नुकताच बुची बाबू स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत झारखंडकडून खेळताना त्यानं चमकदार कामगिरी केली होती. दुलीप ट्रॉफीसाठी त्याचा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारत ‘ड’ संघात समावेश करण्यात आला होता. या संघात देवदत्त पडिक्कल आणि अक्षर पटेलसारखे स्टार खेळाडूही आहेत. मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच इशान दुखापतीचा बळी ठरला. यामुळे त्याच्या जागी संजू सॅमसनचा भारत ‘ड’ संघात समावेश करण्यात आलाय.
दुखापतग्रस्त झाल्यानंतर इशान किशनला फिटनेस परत मिळवण्यासाठी एनसीएमध्ये जावं लागले. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ट्रेनिंग करतो आहे. येथून त्यानं त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, जी आता चांगलीच व्हायरल होत आहे. इशानच्या स्टोरीवर एनसीएच्या भिंतीचा एक फोटो आहे. तुम्ही त्याची इंस्टाग्राम स्टोरी येथे पाहू शकता.
जर आपण इशान किशनच्या एकूण कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्यानं आतापर्यंत भारतासाठी 2 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 32 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात इशाननं कसोटीत 78 धावा, एकदिवसीयमध्ये 933 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 796 धावा केल्या आहेत. इशान किशननं आयपीएलमध्येही खूप धावा केल्या आहेत. त्यानं आयपीएलच्या 105 सामन्यात 2644 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याची कामगिरी चमकदार राहिली आहे. त्यामुळे आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करतो, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
हेही वाचा –
मोठा भाऊ फेल, तर धाकट्या भावानं डाव सांभाळला; दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणातच ठोकलं शतक
इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्यावर टांगती तलवार, दुसऱ्या देशात खेळली जाऊ शकते मालिका; काय आहे कारण?
भारतीय वंशाच्या स्टार क्रिकेटपटूची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये लढतोय आयुष्याची लढाई