भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मालिकेतील पहिला सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला गेला. वनडे मालिकेत व्हाईट वॉश स्वीकारलेल्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात शानदार पुनरागमन केले. खेळाच्या तिन्ही विभागात भारतीय संघावर वर्चस्व गाजवत न्यूझीलंडने 21 धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय संघाची फलंदाजी या सामन्यात सपशेल अपयशी ठरली. त्यात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याचा देखील समावेश होता.
इशान किशन हा या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता. न्यूझीलंडने मोठी धावसंख्या उभारल्यानंतर भारतीय फलंदाजांना आक्रमक खेळ करत ही धावसंख्या पार करणे गरजेचे होते. त्यामुळे सलामीवीर इशान किशन याच्याकडे घरच्या मैदानावर मोठी खेळी करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, तो अवघ्या चार धावा करून मायकेल ब्रेसवेलच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला.
इशान मागील महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात द्विशतक करून चर्चेत आलेला. त्यामुळे वनडे संघातील त्याची जागा निश्चित मानली जाते. परंतु, टी20 क्रिकेटमध्ये मागील बारा सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला आहे. तो या मागील बारा सामन्यात केवळ 180 धावा काढू शकला आहे. यादरम्यान त्याची सरासरी 15 तर स्ट्राईक रेट अवघा 116 राहिला. यादरम्यान त्याने केवळ दोन वेळा 30 चा आकडा पार केला असून, 37 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
पहिल्या सामन्याचा विचार केल्यास, रांची येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत 6 बाद 176 अशी मोठी धावसंख्या उभारली. डेवॉन कॉनवे व डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडसाठी अर्धशतके साजरी केली. भारतासाठी दोन बळी घेणारा वॉशिंग्टन सुंदर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादव व वॉशिंग्टन सुंदर हेच संघर्ष करू शकले. अखेरीस न्यूझीलंडने 21 धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी मिळवली.
मागील 12 सामन्यातील इशान किशनची कामगिरी:
27, 15, 26, 3, 8, 11, 36, 10, 37, 2, 1, 4
(Ishan Kishan Poor Performance Continue In T20I From Last 12 Innings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू मजबूत राहा, तुझा अभिमान आहे’, अखेरच्या ग्रँड स्लॅममध्ये हारताच सानियासाठी शोएबची भावूक पोस्ट
पत्नीसोबत नाचतानाही अक्षरने सोडले नाही क्रिकेट, डान्स फ्लोअरवर लावला षटकार अन् पकडला कॅच; व्हिडिओ पाहाच