प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा शिलेदार इशान किशन यानेदेखील हा परिस्थितीचा सामना केला आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याची बॅट शांत राहिल्याची दिसली. परंतु साखळी फेरीतील शेवटच्या काही सामन्यांत त्याला सूर गवसला आणि त्याने आपल्या बॅटीने विरोधी संघांना चोप देत टी२० विश्वचषकासाठी त्याची झालेली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील अंतिम सामन्यात तर त्याने ८४ धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या या प्रदर्शनाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सामनाही जिंकला आणि इशानने सामनावीर पुरस्कारही पटकावला. या सामन्यानंतर त्याने टी२० विश्वचषकातील आपल्या स्थानाबाबत मोठ्या गौप्यस्फोट केला आहे.
युएईत होणाऱ्या येत्या टी२० विश्वचषक २०२१ साठी बीसीसीआयने १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात २ यष्टीरक्षक फलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये रिषभ पंतसह इशानचाही समावेश आहे. याच इशानला त्याच्या टी२० विश्वचषकातील स्थानाबाबत कर्णधार विराट कोहलीने सांगितले होते की, त्याला टी२० विश्वचषक संघात सलामीवीराच्या रुपात निवडण्यात आले आहे. तसेच आपल्या या भूमिकेसाठी तयार राहण्याचा इशाराही त्याने दिला होता.
यामुळे आता केएल राहुल किंवा रोहित शर्मा यांच्यापैकी एकाला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळणे अवघड झाल्याचे दिसते आहे.
हैदराबादविरुद्ध सामनावीर पुरस्कार स्विकारल्यानंतर याबद्दल खुलासा करताना इशान म्हणाला की, “टी२० विश्वचषकापूर्वी मी पुन्हा चांगल्या लयीत परतल्याचा मला आनंद आहे. मी माझ्या संघासाठी धावा करू शकलो, ही माझ्यासाठी सकारात्मक बाब राहिली आहे. आम्हाला जवळपास २५०-२६० धावा करायच्या होत्या. हा एक सकारात्मक निश्चय होता. मला या सामन्यात सलामीला फलंदाजी करून चांगले वाटले. मला विराट भाईनेही हेच सांगितले होते की, मला टी२० विश्वचषाकासाठी सलामीवीराच्या रुपातच निवडले गेले आहे. त्यामुळे मला त्यासाठी तयार राहावे लागेल, असेही त्याने मला सांगितले होते.”
“मला वाटते की, उच्च स्तरावर क्रिकेटपटूला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याची गरज असते. फक्त क्रिकेटपटूने योग्य मनस्थितीत राहणे महत्त्वाचे असते आणि त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्मसोबत मैदानात उतरण्याची गरज असते. माझा विराट भाईसोबत छूप चांगला संवाद झाला आहे. जसप्रीत भाईने सुद्धा माझी खूप मदत केली आहे. सर्वांनी माझे समर्थन केले आहे. हे माझे शिकण्याचे वय आहे व इथूनच मी माझ्या चूकांवर काम करत विश्वचषकात त्यांची पुनरावृत्ती करू नये असे सांगत माझी समजूत काढली आहे,” असेही तो म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीचे नेतृत्त्वपद सोडण्याबाबत कोहलीने जवळच्या मित्राशी केली होती चर्चा, स्वत: केला उलगडा
भरतचा सॉलिड षटकार अन् जणू ट्रॉफी जिंकल्याप्रमाणे आरसीबीच्या ताफ्यात जल्लोष, पाहा तो क्षण






