आशिया चषक 2023चे विजेतेपद भारताने मिळवले. रविवारी (17 सप्टेंबर) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला, जो भारताने 10 विकेट्सने नावावर केला. मोहम्मद सिराज भारतासाठी मॅच विनर ठरला. पण फलंदाजी करताना सलामीवीरांनी विकेट टिकवून ठेवल्यामुळे संघाला मोठा विजय मिळाला. सामना संपल्यानंतर ईशान किशन याने रोहितचे आभार मानले.
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचा नियमित सलामीवीर फलंदाज आहे. पण आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात त्याने डावाची सुरुवात केली नाही. शुबमन गिल (Shubman Gill) आणि त्याची साथ देण्यासाठी रोहितच्या जागी ईशान किशन (Ishan Kishan) फलंदाजीला आला. ईशानने 23 आणि गिलने 27 धावा करत भारताला मिळालेले 51 धावांचे लक्ष्य अवघ्या 6.1 षटकात गाठले. विजयानंतर स्वतः रोहितनेच आपल्याला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली, असा खुलासा ईशानकडून केला गेला.
भारतीय संघाच्या इतिहासात हा आठवा आशिया चषक विजय ठरला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात हा सलग दुसरा आशिया चषक भारताने जिंकला. श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर ईशान किशन म्हणाला, “इच्छा असेल तर डावाची सुरुवात करू शकतो, असे कर्णधार म्हणाला. मग मी देखील सलामीला आलो. 50 धावा हव्या असल्यामुळे जास्त काही करता येणार नव्हते. पण आम्ही खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न केला.”
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक जिंकून श्रीलंकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. जसप्रीत बुमराह याने 3, तर मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह यालाही एक विकेट मिळाली. 51 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय संघ फलंदाजीला आल्यानंतर श्रीलंकन गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही. (Ishan Kishan thanked Rohit Sharma after winning the Asia Cup)
आशिया चषक फायनलसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका – पथुम निसांका, कुशल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना.
महत्वाच्या बातम्या –
पंगा घेणाऱ्या श्रीलंकेला भारताने दाखवला इंगा! अखेर 24 वर्षांनंतर घेतला बदला, 1999मध्ये लंकेने काय केलेलं?
मोहम्मद सिराज बनला पावरप्लेचा बादशाह! मोडीत निघाला जवागल श्रीनाथचा खास विक्रम