इंग्लंड आणि भारत याच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना गुरूवारी (12 ऑगस्ट) पासून लाॅर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ सामन्याआधी खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे चिंतेत आहेत. भारतीय संघातील शार्दुल ठाकुरला दुसऱ्या कसोटीत खेळता येणार नाही. इंग्लंडचा स्टुअर्ट ब्राॅड पुर्ण मालिकेसाठी उपलब्ध नसेल.
लाॅर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर भारताला इंग्लंडविरुद्ध केवळ दोन वेळा विजय मिळाले आहेत. या मैदानावर विराटसेनेची कामगिरिही समाधानकारक राहिली नाही. 2014 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने लाॅर्ड्सवर विजय मिळवला होता. या सामन्यात इशांत शर्माने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे इशांत शर्मा शार्दुल ठाकूरचा योग्य पर्यायी खेळाडू ठरू शकतो.
इशांतच्या समोर त्या सामन्यात ऍलिस्टर कुक आणि जो रुट यांच्यासारख्या खेळाडूंनीही गुडघे टेकले होते. आता 7 वर्षानंतर इशांत कर्णधार कोहलीसोबत पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर आहे. शार्दुल ठाकुर दुखापतीमूळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे कर्णधार कोहली इशांतला संघात खेळण्याची संधी देऊ शकतो. इशांतकडे इंग्लंड दौऱ्याचा चांगलाच अनुभव आहे. भारतासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळलेला इशांत एकदा लयात गोलंदाजी करू लागला तर तो इंग्लंडच्या आख्ख्या संघाला तंबूत पाठवेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
भारतीय संघाला आजपर्यंत लाॅर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये केवळ दोन विजय मिळाले आहेत. 1986 मध्ये मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघाला 28 वर्षांच्या मोठ्या काळाने दुसरा विजय मिळाला. मात्र, यंदाच्या कसोटी मालिकेत परिस्थिती वेगळी आहे. भारतीय वेगवान गोलंदाज चांगल्या फाॅर्मात आहेत. भारतीय वेगवान गोलंदाजांनी पहिल्या कसोटी सामन्यात संघासाठी चांगली कामगिरी करून सामना विजयाच्या जवळ आणून ठेवले होता. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे खेळ झाला नाही आणि सामना अनिर्णीत राहिला.