ऑस्ट्रेलिया दौर्यावरील पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला मालिकेत पुनरागमन करून देण्याचे कडवे आव्हान रहाणेसमोर असेल. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाची ही कठीण परीक्षा असेल. मात्र यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने अजिंक्य रहाणेचे कौतुक केले. रहाणे गोलंदाजांना प्राधान्य देणारा कर्णधार असल्याचे सांगत इशांतने त्याच्या नेतृत्वकौशल्याची स्तुती केली.
अजिंक्य रहाणे गोलंदाजांचा कर्णधार
ईएसपीएन क्रिकइन्फोला मुलाखत देताना इशांत शर्मा अजिंक्य रहाणेबद्दल म्हणाला, “तो कायमच गोलंदाजांना प्राधान्य देणारा कर्णधार आहे. मी ज्यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे, तेव्हा प्रत्येकवेळी त्याने माझ्याशी विचारविनिमय करून निर्णय घेतले आहेत. तो नेहमीच त्याच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षण कसे लावायचे, याबद्दल विचारतो. त्याने मला अनेकदा केव्हा गोलंदाजी करण्याची इच्छा आहे, हेदेखील विचारले आहे. त्यामुळे मला वाटतं की तो खऱ्या अर्थाने गोलंदाजांचा कर्णधार आहे.” विराट कोहलीच्या उपस्थितीतही रहाणे गोलंदाज आणि कर्णधारांमध्ये संवाद कायम राहील, ह्याकडे लक्ष ठेवतो, अशी पुस्तीही इशांतने जोडली.
रहाणे शांत परंतु आत्मविश्वासू कर्णधार
अजिंक्य रहाणे मैदानावर कायमच संयमी आणि शांत असल्याचे दिसून येते. रहाणे आपल्या भावनांचं प्रदर्शन मैदानावर करत नाही. याबाबत विचारले असता इशांत म्हणाला, “अजिंक्य मैदानावर नक्कीच शांत असतो. किंबहुना विराटच्या तुलनेत तर ते अधिकच जाणवते. परंतु, अजिंक्यमध्ये पुरेपूर आत्मविश्वास आहे. आखलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याची कला त्याच्याकडे आहे. तो मैदानावर शांत दिसत असला तरी मैदानाबाहेर तो हास्यविनोदात नेहमीच सामील असतो. पण त्याच्या शांत स्वभावामुळे मैदानात दबावाची परिस्थिती असली तरी संघ समतोल पद्धतीने ते हाताळू शकतो.”
इशांत शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौर्यावरील कसोटी मालिकेला मुकला आहे. पण त्याच्या या कौतुकामुळे रहाणेच्या अंगावर नक्कीच मूठभर मांस चढले असेल. याच कौतुकाला जागून उर्वरित मालिकेत भारतीय संघाची बुडती नौका अजिंक्य रहाणे तारून नेऊ शकतो का, याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल.
संबंधित बातम्या:
– विराट तर गेला, आता पाहू भारतीय संघ कशाप्रकारे उर्जा मिळवणार
– तुझ्या पत्नीला माझ्या शुभेच्छा दे, स्टीव स्मिथने विराटला पहिल्या कसोटीनंतर दिला संदेश
– व्हिडिओ: भारतीय संघ सरावात घेतोय कठोर मेहनत, दुसर्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनचेही मिळाले संकेत