दिल्ली। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) आजच्या (31 जानेवारी) सामन्यातही केरळा ब्लास्टर्स एफसीची निराशाजनक कामगिरी कायम राहिली आहे. गुणतक्त्यात या लढतीपूर्वी त्यांच्यापेक्षा खाली असलेल्या दिल्ली डायनॅमोज एफसीविरुद्ध ब्लास्टर्सला 0-2 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला.
दिल्लीला 29व्या मिनिटाला कॉर्नर मिळाला. रेने मिहेलीच याने मारलेला चेंडू बॉक्समध्ये गेला तेव्हा जियान्नीला कुणाचेच मार्किंग नव्हते. ब्लास्टर्सच्या या ढिलाईचा फायादा उठवित त्याने शानदार व्हॉलीवर चेंडूला नेटची दिशा दिली. ब्लास्टर्सचा गोलरक्षक धीरज सिंग याच्या हाताला लागून चेंडू नेटमध्ये गेला. सेट-पिसेसवरील हा गोल स्थानिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरला.
दिल्लीचा दुसरा गोल भरपाई वेळेत पेनल्टीवर झाला. लालीयनझुसा छांगटे याने बॉक्समध्ये मुसंडी मारली होती. त्याच्यासमोर केवळ धीरज होता. त्याचवेळी लालरुथ्थाराने त्याला पाडले. त्यामुळे लालरुथ्थाला याला दुसऱ्या यलो कार्डसह मैदान सोडावे लागले, तसेच दिल्लीला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर मिहेलीच याने मारलेल्या फटक्यावर धीरजचा अंदाज चुकला.
दिल्लीने 13 सामन्यांत दुसरा विजय मिळविला असून चार बरोबरी व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 10 गुण झाले. ब्लास्टर्सला 14 सामन्यांत एकमेव विजय मिळाला असून हा त्यांचा सहावा पराभव आहे. त्यांच्या खात्यात सलामीला मिळविलेला एकमेव विजय जमा आहे. ब्लास्टर्सचे दहा गुण आहेत, पण आजच्या पराभवासह त्यांचा गोलफरक घसरला. दिल्लीचा गोलफरक 15-21 असा उणे 6, तर ब्लास्टर्सचा 13-23 असा उणे 10 आहे. यामुळे दिल्लीने ब्लास्टर्सला मागे टाकून आठवे स्थान गाठले.
पहिल्याच मिनिटाला दिल्लीचा मध्यरक्षक लालीयनझुला छांगटे याने चेंडू मिळताच मुसंडी मारली. त्याने जोरदार मारलेला चेंडू ब्लास्टर्सच्या सिरील कॅली याच्या छातीत लागला. योग्य वैद्यकीय उपचारानंतर तो खेळण्यास पुन्हा सज्ज झाला.
ब्लास्टर्सने 11व्या मिनिटाला प्रयत्न केला. निकोला क्रॅमरेविच याने हवेतून स्लाविसा स्टोयानोविच याला पास दिला. बचाव रेषेजवळ हे घडले तेव्हा दिल्लीच्या खेळाडूंना ऑफसाईडचा अंदाज वाटत होता, पण स्लाविसा बॉक्सजवळ आला. त्याने सैमीनलेन डुंगल याच्या दिशेने मैदानालगत क्रॉस पास दिला, पण डुंगल चेंडूपर्यंत जाऊ शकला नाही. तोपर्यंत दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याने झेपावत चेंडू अडविला.
पूर्वार्ध जवळ आला असताना दोन्ही संघांनी उल्लेखनीय प्रयत्न केले. 41व्या मिनिटाला छांगटेने डावीकडून मार्कोस टेबार याला पास दिला. टेबारचा फटका गोलपोस्टच्या उजवीकडून थोडक्यात बाहेर गेला. दिल्लीचा हा प्रयत्न ब्लास्टर्सची चिंता वाढविणारा होता, पण मध्यंतरास काही सेकंद बाकी असताना ब्लास्टर्सला फ्री किक मिळाली. कॅलीने ती घेत बॉक्समध्ये फटका मारला. हा चेंडू संदेश झिंगन याच्यादिशेने गेला. त्याने वेगवान हालचाली केल्या, पण नारायण दासने चेंडू ब्लॉक केला.
उत्तरार्धात स्टोयानोविचने डावीकडून बॉक्समध्ये प्रवेश केला. त्यावेळी नेमांजा लॅकीच-पेसिच हेडिंगसाठी सज्ज होता. त्याने चपळाईने हेडिंग केले, हा चेंडू थोडक्यात क्रॉसबारला लागला. ब्लास्टर्सकरीता ही संधी हुकणे निराशाजनक ठरले.
महत्त्वाच्या बातम्या-
–हे भारतीय खेळाडू त्यांच्या २००व्या वन-डे सामन्यात ठरले आहेत यशस्वी
–पदार्पणाच्या सामन्यातच शुबमन गिलने विराट कोहलीला टाकले मागे
–दुखापतीतून सावरत असलेला पृथ्वी शॉ म्हणतो, ‘अपना टाईम आयेगा’…