कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (28 नोव्हेंबर) अॅटलेटिको दी कोलकाता (एटीके) आणि एफसी गोवा यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली. येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर दोन्ही संघ अनेक वेळा प्रयत्न करूनही फिनिशींगची जोड देऊ शकले नाहीत. त्याचवेळी दोन्ही संघांच्या मिळून पाच खेळाडूंना यलो कार्डला सामोरे जावे लागले. या बरोबरीसह गोव्याने एक क्रमांक प्रगती करीत तीनवरून दुसरे स्थान गाठले.
गोव्याने नऊ सामन्यांत पाच विजय, दोन बरोबरी, दोन पराभव अशा कामगिरीसह 17 गुण मिळविले आहेत. त्यांचा गोलफरक 8 (22-14) नॉर्थइस्ट युनायटेड एफसीच्या 6 पेक्षा (14-8) सरस ठरला. नॉर्थइस्टचेही 17 गुण आहेत. बेंगळुरू एफसी सात सामन्यांतून सर्वाधिक 19 गुणांसह आघाडीवर आहे. एटीकेने सहावे स्थान कायम राखले. नऊ सामन्यांतून तीन विजय-तीन बरोबरी-तीन पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे 12 गुण आहेत.
या लढतीत एटीकेच्या जॉन जॉन्सन, आंद्रे बिके, प्रोणय हल्दर, तर गोव्याच्या एदू बेदीया, कार्लोस पेना अशा पाच खेळाडूंना यलो कार्ड दाखविण्यात आली.
गोव्याने पहिला प्रयत्न सातव्या मिनिटाला केला. ब्रँडन फर्नांडिसने ही चाल रचली. त्याने जॅकीचंद सिंगला पास दिला. सेरीटॉन फर्नांडिस उजवीकडून जॅकीचंदच्या बरोबरीने धावत होता. त्याचा पास मिळताच सेरीटॉनने फटका मारला, पण चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला. पुढच्याच मिनिटाला लेनी रॉड्रीग्जचा धक्का लागून प्रोणय हल्दरच्या नाकाला दुखापत झाली.
मौर्तादा फॉलने 13व्या मिनिटाला सुवर्णसंधी दवडली. कॉर्नरवर उजवीकडे अहमद जाहौह याला चेंडू मिळाला. त्याने पलिकडील बाजूला चेंडू मारला. त्यावर फॉलने हेडिंगद्वारे प्रयत्न केला, पण तो स्वैर होता. त्यानंतर थोड्याच वेळात ब्रँडनने कार्लोस पेनाला पास दिला. त्यावेळी पेनाला संधी होती, पण त्याचा चेंडू चिंगलेनसाना सिंगने ब्लॉक केला.
एटीकेच्या जयेश राणे याने 27व्या मिनिटाला हितेश शर्माला पास दिला. हितेश आगेकूच करीत असतानाच एव्हर्टन सँटोसने धावत स्वतःला योग्य जागी आणले. पास मिळताच त्याने फटका मारला, पण तो लक्ष्य साधू शकला नाही.
दोन मिनिटांना मॅन्युएल लँझरॉतने जयेशला मैदानालगत उजवीकडून पास दिला. एव्हर्टन याने नेटच्या दिशेने धावत प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या पायाला लागला आणि गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याने सहज बचाव केला.
36व्या मिनिटाला एव्हर्टन याने गेर्सन व्हिएरा याला पास दिला. त्याच्याकडून चेंडू मिळताच लँझरॉतने छातीने नियंत्रीत करीत नेटच्या डाव्या कोपऱ्यात फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याने उजव्या पायाने मारलेल्या फटक्यावर नवाझ चकला होता, पण अचुकतेअभावी चेंडू बाहेर गेला.
उत्तरार्धात 49व्या मिनिटाला एदू बेदीया याने लांबून चांगला फका मारला, पण एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याने व्यवस्थित अंदाज घेत चेंडू अडविला. 54व्या मिनिटाला एटीकेने लक्षवेधी प्रयत्न केला. एव्हर्टन याने लँझरॉतला उत्तम पास दिला. मग या चालीतून जयेशला चेंडू मिळाला. त्याला संधी होती. त्यानुसार त्याने फटका पण मारला, पण नवाझने तो थोपविला. हा चेंडू पेनाकडे गेला आणि त्याने हेडिंग करून बाहेर घालविला. त्यातून मिळालेल्या कॉर्नरवर फार काही घडले नाही.
60व्या मिनिटाला सेरीटॉनने फाऊल केल्यामुळे एटीकेला फ्री किक मिळाली. ती लँझरॉतने घेतली. त्याने बॉक्समध्ये सुंदर चेंडू मारला. त्यावर व्हिएराने हेडिंग केले, पण चेंडू थोडक्यात बाहेर गेला.
66व्या मिनिटाला गोव्याचा बदली खेळाडू मानवीर सिंग याने एटीकेच्या बचाव फळीमागून धाव घेतली. प्रतिस्पर्ध्याला चकविण्यासाठी डाव्या पायाने फटका मारण्याची अॅक्शन करीत त्याने प्रत्यक्षात उजव्या पायाने फटका मारत आगेकूच सरु ठेवली. त्याने मारलेला चेंडू एटीकेच्या आंद्रे बिके याच्या हाताला लागून नेटच्या दिशेने जात होता. त्याचवेळी जॉन जॉन्सनने चपळाईने तो बाजूला मारला. एटीकेच्या सुदैवाने बिकेच्या हाताला चेंडू लागल्याचे दिसले नाही. अंतिम क्षणी फेरॅन कोरोमीनासच्या चालीवर बेदीया संधी साधू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व कायम
–Video: गोलंदाजांना सराव देताना तोल गेल्याने स्मिथ पडला खाली
–विकेटकीपर म्हणून पार्थिवच हवा, रिषभ पंत नकोच