चेन्नई | येथील नेहरू स्टेडियमवर शनिवारी चेन्नईयीन एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे. बाद फेरीतील प्रवेश नक्की झाल्यामुळे चेन्नईचा दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी देऊन त्यांची चाचणी घेण्याचा प्रयत्न राहील.
चेन्नईचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांनी संघातील खेळाडूंचे कौतुक केले. चेन्नईचा हा शेवटचा साखळी सामना असून त्यांना दोन ते चार यापैकी एक क्रमांक मिळण्याची अपेक्षा आहे. उपांत्य फेरीत कोण प्रतिस्पर्धी असेल याची चिंता वाटत नसल्याचे ग्रेगरी यांनी स्पष्ट केले. मुंबईविरुद्ध महत्त्वाच्या लढतीवर लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, मी एक-दोन बदल करेन. बेंचवर किंवा स्टेडियममधील संघाच्या कक्षात बसावे लागलेल्या काही खेळाडूंना मी संधी देईन. ते संधी मिळण्याच्या योग्यतेचे आहेत. त्यांनी चांगली कामगिरी केली आणि ते संघाच्या स्वरुपात स्थिरावले तर पुढील सामन्यासाठी संघनिवडीचा पेच निर्माण होतो.
ग्रेगरी अनुभवी असून त्यांना सुमारे 30 वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव आहे. यात त्यांनी काही प्रमुख संघांना मार्गदर्शन केले आहे. ग्रेगरी यांनी संघाचे मनापासून भरभरून कौतूक केले. ते म्हणाले की, माझ्याकडे अप्रतिम खेळाडूंचा संघ आहे. कारकिर्दीत मी अनेक संघांना मार्गदर्शन केले आहे, पण असा संघ मला कधीच माहित नव्हता. मार्गदर्शन करण्यासाठी हे अत्यंत आदर्श खेळाडू आहेत. ते कौतुकास सर्वार्थाने पात्र आहेत. आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकून किमान अंतिम फेरी गाठू अशी आशा आहे.
चेन्नईने 2015 मध्ये विजेतेपद मिळविले, पण गेल्या मोसमात इटलीचे माजी विश्वकरंडक विजेते मार्को मॅटेराझी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले.
दुसरीकडे मुंबईला मागील सामन्यात दिल्ली डायनॅमोजविरुद्धच्या पराभवामुळे बाद फेरीच्या मोहीमेत अपयश आले. गेल्या वर्षी कोस्टारीकाच्या अलेक्झांड्रे गुईमाराएस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने साखळीत अव्वल स्थान मिळविले होते. त्यामुळे यंदाची कामगिरी मुंबईसाठी निराशाजनक ठरली. यानंतरही हा सामना महत्त्वाचा असल्याचे गुईमाराएस यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही खेळण्याचा दृष्टिकोन गमावलेला नाही. मी निवडीसाठी उपलब्ध असलेल्या खळाडूंमधून सर्वोत्तम संघाची निवड करेन. आम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीमधून जावे लागले. खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागला. त्यामुळे कोण तंदुुरुस्त आहे हे पाहावे लागेल. आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न करू. जिंकलो तर आम्ही सहावे स्थान मिळवू शकतो.
मुंबई 23 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. जिंकल्यास ते केरळा ब्लास्टर्सला (25 गुण) मागे टाकतील.