कोची | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शुक्रवारी येथील नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्स आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात महत्त्वाचा सामना होत आहे. दक्षिणेतील या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना बाद फेरीची संधी आहे.
ब्लास्टर्स अपराजित मालिका पाच सामन्यांपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यांना विजयाची गरज असेल, तर चेन्नईच्या आशा पराभवानंतरही कायम राहतील. दोन्ही संघांचे प्रत्येकी दोनच सामने उरले आहेत. त्यांच्यातील आधीची लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. त्यात एक मिनिट बाकी असताना रेने मिहेलीचने चेन्नईचा गोल केला होता, तर सी. के. विनीतने भरपाई वेळेत ब्लास्टर्सचा गोल केला होता . तेव्हा मोसमाचा पहिला टप्पा असल्यामुळे दोन्ही संघांना बरोबरी चालू शकली. आता मात्र त्यांना निर्णायक विजय हवा आहे.
चेन्नईयीनचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी म्हणाले की, आमच्यासाठी वेळापत्रक अवघड होते. सामने खेळायचे, एकच दिवस विश्रांती आणि लगेच पुढील सामन्यासाठी विमान प्रवास असे आम्हाला करावे लागले. गेल्या चार सामन्यांत मिळालेल्या गुणांविषयी आम्ही समाधानी आहोत. मी संघात फारसा बदल करीत नाही. त्यामुळे खेळाडूंवर बराच ताण पडला. यातूनच माझ्या संघाचे सातत्य व क्षमता स्पष्ट होते. आम्ही अशा चिवट कार्यपद्धतीमुळेच एवढी मजल मारली आहे. आता आम्हाला चार-पाच दिवस विश्रांती मिळाली आहे, जे क्वचितच घडते. त्यामुळे आमचा संघ चांगल्या प्रकारे सज्ज झाला आहे.
ब्लास्टर्सकरीता सुद्धा अशीच स्थिती आहे. त्यांना सुरवातीला अशाच वेळापत्रकाला सामोरे जावे लागले. ग्रेगरी यांनी सांगितले की, मागील सामन्याच्यावेळी त्यांचे खेळाडू वैयक्तिक तसेच सांघिक पातळीवर झगडत होते, पण डेव्हिड जेम्स यांच्या रुपाने नवे प्रशिक्षक आल्यानंतर त्यांच्या संघात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आणि त्यामुळे कामगिरीत मोठा फरक पडला.
जेम्स स्वतः फार आत्मविश्वास बाळगून आहेत. कारकिर्दीत दुसऱ्यांदा ब्लास्टर्सची सुत्रे स्विकारल्यानंतर सुरवातीला आपल्याविषी प्रश्नचिन्ह होते असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, मुख्य प्रशिक्षक म्हणून मला असलेल्या अनुभवाबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह होते. पहिल्या दिवसापासून मात्र ब्लास्टर्समधील प्रत्येक खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षकच नव्हे तर प्रत्येक जण क्लबशी किती एकरुप झाला होता हाच महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे समविचारी सपोर्ट स्टाफच्या मदतीने प्रत्येकाच्यात आत्मविश्वास निर्माण करणे सोपे गेले. तसे भासवायची इच्छा नसतानाही प्रत्यक्षात सहजतेने हे घडले.
या महत्ताच्या सामन्याविषयी जेम्स म्हणाले की, दोन्ही संघांचा खेळ भक्कम होण्याची अपेक्षा आहे. चेन्नई जिंकण्याची व बाद फेरीत जाण्याची आम्हाला अपेक्षा आहे. आमच्यादृष्टिने सांगायचे झाले तर जिंकावे लागेल. दोन्ही सामन्यांतून सहा गुण मिळवावे लागतील.
जेम्स यांच्या प्रतिक्रियेवरून दोन्ही संघ आक्रमक खेळ करतील असे स्पष्ट संकेत मिळतात.