बेंगळुरू | बेंगळुरू एफसीने पदार्पण केल्यापासून प्रत्येक मोसमात एक महत्त्वाचे विजेतेपद जिंकले आहे. या संघाने प्रतिष्ठेच्या स्पर्धांत प्रभावी कामगिरी केली आहे. हिरो इंडियन सुपर लिगच्या शनिवारी श्री कांतीरवा स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्या याच अनुभव आणि क्षमतेची कसोटी लागेल. या लिगमध्ये पदार्पण करणारा हा संघ याच अनुभवाच्या जोरावर अंतिम सामन्यात दमदार खेळ करण्याच्या विश्वासाने मैदानावर उतरेल.
बेंगळुरूने गेल्या चार मोसमांत आय-लीग किंवा फेडरेशन करंडक जिंकला आहे. आता पदार्पणात आयएसएल विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम करण्याची त्यांना संधी आहे. त्यासाठी त्यांना चेन्नईयीन एफसीला हरवावे लागेल.
बेंगळुरूने आयएसएलमध्ये याच मोसमात प्रवेश केला, पण नवोदीत संघाप्रमाणे निर्णयक्षमतेचा अभाव किंवा प्रतिस्पर्ध्याच्या लौकीकासमोर दबून जाणे असे त्यांच्या बाबतीत घडलेले नाही.
बेंगळुरूने साखळी टप्याच्या गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविले. त्यांनी 35 गोल नोंदविले. लिगमध्ये सर्वाधिक 13 विजय त्यांनी संपादन केले. याशिवाय तब्बल चार सामने राखून त्यांनी बाद फेरीतील स्थान सर्वप्रथम नक्की केले. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावरील चेन्नईयीनपेक्षा ते तब्बल आठ गुणांनी पुढे होते. इतक्या सहजसुंदर कामगिरीवरून त्यांचा खेळ नवोदीत नव्हे तर कसलेल्या संघास साजेसा झाल्याचे स्पष्ट होते.
याचे बहुतांश श्रेय संघाच्या रचनेला द्यावे लागेल. महत्त्वाच्या ठिकाणी (पोझीशन) खेळण्यासाठी त्यांच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांचे मुख्य प्रशिक्षक अल्बर्ट रोका म्हणाले की, आमच्याकडे एएफसी करंडक उपांत्य व अंतिम फेरी, फेडरेशन करंडक अंतिम फेरी खेळलेले खेळाडू आहेत. अंतिम सामन्यात मैदानावर उतरून सर्वोत्तम प्रयत्न करण्याचा आमचा उद्देश आहे.
रोका यांच्या पहिल्या पसंतीच्या अंतिम संघात तसेच काही प्रमाणात बेंचवर कसलेले खेळाडू आहे, ज्यांना जेतेपद जिंकण्यासाठी कसा खेळ करावा लागतो याचा अनुभव आहे. त्यांचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू हा अनुभवी अांतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्याला युरोपमधील साखळीत सहभागाचा अनुभव आहे. आघाडी फळीत सुनील छेत्री आणि मिकू असे खेळाडू आहेत, जे बरेच अनुभवी आहेत. अशा प्रकारे एकुणच संघ अनुभवी खेळाडूंनी भारलेला आहे.
मिकूच्या कारकिर्दीची जडणघडण व्हॅलेन्सिया युवा अॅकॅडमीत झाली. त्याला ला लीगाचा विपुल अनुभव आहे. तो 32 वर्षांचा आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये त्याला ला लीगाचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू हा किताब सुद्धा मिळाला होता. त्याचे कौशल्य वादातीत आहे. परिपक्वतेमुळे त्याने खेळात सातत्य आणि मोक्याच्या क्षणी गोल करण्याची क्षमता साध्य केली आहे.
सुनील छेत्री हा स्वतः महत्त्वाच्या सामन्यांचा अनुभवी खेळाडू आहे. त्याची अतुलनीय कामगिरी सर्वश्रुत आहे. याशिवाय उदांता सिंग केवळ 21 वर्षांचा असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थिरावलेला असून चार मोसम अव्वल श्रेणी साखळीत खेळला आहे.
सुनील छेत्रीने सांगितले की, आम्ही अंतिम फेरी म्हणजे नेहमीसारखाच आणखी एक सामना अशा दृष्टिकोनातून पाहू. आम्ही अंतिम फेरी आहे म्हणून प्रमाणापेक्षा जास्त विचार करणार नाही.
तो म्हणाला की, हा अंतिम सामना आहे म्हणून आम्ही आमच्यावर कोणतेही दडपण येऊ देणार नाही. आम्ही खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात सातत्य राखले आहे. असे असले तरी आम्हाला सुधारणा करण्यास आणखी बराच वाव आहे. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करणे महत्त्वाचे असेल.
मध्य फळीतील स्पेनच्या डिमास डेल्गाडो (वय 35) आणि ऑस्ट्रेलियाचा एरीक पार्टालू (31) या दोघांनी ए-लिगमध्ये कौशल्याची सिद्धता केली आहे. बचाव फळीत जॉन जॉन्सन (29) हा प्रारंभापासून बेंगळुरू एफसीकडे आहे. दोन आय-लीग विजेतिपदे आणि 2016च्या एएफसी करंडक अंतिम फेरीपर्यंतची वाटचाल अशा कामगिरीत त्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
जुआनन (30) या बेंगळुरूच्या भक्कम बचाव फळीतील आणखी एक मोहरा आहे. तो रिएक्रीटीवो हुएल्वा या रेयाल माद्रिद ब संघाकडून खेळला आहे. हंगेरीतील साखळीत त्याने करंडक असून त्यानंतर तो भारतात आला.
हरमनज्योत खाब्राने (29) चेन्नईयीन एफसीकडून आयएसएल विजेतेपद मिळविले आहे. लेनी रॉड्रीग्ज गेल्या काही काळापासून भारतात उच्च पातळीवर खेळतो आहे. त्याने चर्चिल ब्रदर्सकडून आय-लीग विजेतेपद पटकावले आहे. राहुल भेके (27) हा आयएसएलमधील अनुभवी खेळाडू आहे. केरळा ब्लास्टर्स आणि एफसी पुणे सिटी अशा संघांकडून तो खेळला आहे.
खरे तर शुभाशिष बोस (22) याचा अपवाद वगळल्यास रोका यांच्या पहिल्या पसंतीच्या संघातील प्रत्येक खेळाडू अनुभवी आणि विजेता आहे. तसे पाहिले तर बोस सुद्धा गेले दोन मोसम मोहन बागान आणि स्पोर्टिंग क्लब द गोवा यांच्याकडून नियमीतपणे खेळला आहे. आता त्याची राष्ट्रीय शिबीरासाठी निवड झाली आहे.
बेंगळुरूने जोमदार खेळाला दर्जाची जोड देत आतापर्यंत सफाईदार घोडदौड केली यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. प्रतिष्ठेच्या स्पर्धांतील निर्णायक सामने खेळण्याच्या अनुभवामुळेच बेंगळुरूचे पारडे माजी विजेत्या तसेच दोन वेळा उपांत्य फेरी गाठलेल्या चेन्नईयीन विरुद्ध जड असेल.