दिल्ली | दिल्ली डायनॅमोज एफसीला हिरो इंडियन सुपर लिगच्या अंतिम टप्यात चांगला फॉर्म गवसला आहे. मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाने अशीच जिगर मोसमाच्या प्रारंभी दाखविली असती तर काय घडले असते असे आश्चर्य अनेकांना वाटत आहे. शुक्रवारी नेहरू स्टेयिडमवर दिल्लीची एफसी पुणे सिटीशी लढत होत आहे. बाद फेरीच्या आशा संपल्या असल्या तरी घरच्या मैदानावर सलग तिसरा विजय मिळवून हॅट््ट्रिक साधण्याचे दिल्लीचे लक्ष्य असेल.
दिल्लीने गेल्या पाच सामन्यांत अपराजित मालिका राखली आहे. एटीके आणि मुंबई सिटी एफसी यांच्याविरुद्ध घरच्या मैदानावर दिल्लीने पाठोपाठ विजय मिळविले आहेत. आता बाद फेरीतील स्थान आधीच नक्की केलेल्या पुण्याला हरवून हॅट््ट्रीक पुर्ण करण्याची पोर्तुगाल यांना आशा आहे.
पोर्तुगाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, विजय मिळविल्यानंतर संघातील वातावरण फार चांगले आहे, पण पुन्हा जिंकण्यासाठी आम्हाला पुन्हा चांगला खेळ करावा लागेल.
स्पेनच्या या प्रशिक्षकांनी प्रतिस्पर्धी संघावर दडपण असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, आम्ही आनंदासाठी खेळू, तर पुण्याला जिंकण्याची गरज असेल.
मोसमातील पहिल्या सामन्यात दिल्लीने पुण्याला पुण्यात 3-2 असे हरविले होते. पुण्याची आगेकूच नक्की झाली असली तरी मागील सामन्यांत एफसी गोवा संघाविरुद्ध झालेला 0-4 असा पराभव त्यांचे जिगरी प्रशिक्षक रँको पोपोविच यांच्या पचनी पडलेला नाही. महत्त्वाच्या बाद फेरीपूर्वी संघाने पुन्हा विजयी मार्गावर येण्याची गरज असल्याचे वाटते.
पोपोविच म्हणाले की, मागील सामना निव्वळ अपवाद होता हे आम्हाला दाखवून द्यावे लागेल. तुम्ही जिंकत नाही ही नव्हे तर जेव्हा तुम्ही जिंकण्याची इच्छा दाखवित नाही तेव्हा ती समस्या असते. मागील सामन्यात हेच घडले.
या लढतीच्या महत्त्वाविषयी ते म्हणाले की, मोसमातील हा आमचा शेवटचा साखळी सामना असल्याने जिंकणे महत्त्वाचे आहे.
खेळाडूंच्या कामगिरीवर टीका करताना ते म्हणाले की, आमचे खेळाडू प्रमाणाबाहेर निर्धास्त होते. त्यामुळे गोव्याविरुद्ध फटका बसला. जेव्हा चांगला खेळ होतो तेव्हा तुम्ही केवळ एका सामन्यात निर्धास्त बनलात तरी तुम्हाला फटका बसेल असे मी खेळाडूंना बजावले होते. तेव्हा त्यांना जाणीव झाली नव्हती आणि आता मात्र ती झाली आहे.
पुण्याला सर्वाधिक गोल केलेल्या मार्सेलिनीयो यास निलंबनामुळे मुकावे लागेल, तर दिल्लीला विनीत राय याची अनुपस्थिती जाणवेल.