दिल्ली : हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शनिवारी दिल्ली डायनॅमोजने गतविजेत्या एटीकेला धक्का दिला. तब्बल सात गोलांचा वर्षाव झालेली लढत दिल्लीने 4-3 अशी जिंकली. नेहरू स्टेडियमवर 1-3 अशा पिछाडीवरून दिल्लीने बाजी मारली. कालू उचे याने दोन गोल नोंदवितानाच निर्णायक गोलच्यावेळी पास दिला.
केवळ दोन मिनिटांच्या भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटाला मॅटीयस मिराबाजे याने विजयी गोल केला. मॅन्युएल अराना याने ही चाल रचत कालू उचे याला पास दिला. कालूने मिराबाजेच्या दिशेने चेंडू मारला. मग मिराबाजेने उरलेले काम चोख पार पाडले.
या लढतीपूर्वी एटीके आठव्या, तर दिल्ली नवव्या क्रमांकावर होते. बाद फेरीच्या आशा केव्हाच संपुष्टात आल्या असल्या तरी मोसमाची किमान सांगता तरी विजयाने करण्याची प्रेरणा दोन्ही संघांना होती. त्यातही दिल्लीचे 12, तर एटीकेचे 13 गुण होते. साहजिकच सामना चुरशीने होणे अपेक्षित होते. यात दिल्लीने निर्णायक विजयासह एटीकेला मागे टाकत आठवा क्रमांक मिळविला. दिल्लीने 16 सामन्यांत चौथा विजय मिळविला असून तीन बरोबरी व नऊ पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे 15 गुण झाले. एटीकेला 16 सामन्यांत नववा पराभव पत्करावा लागला. 13 गुणांत भर टाकता न आल्यामुळे त्यांना एक क्रमांक खाली जावे लागले.
पहिल्या गोलसाठी प्रेक्षकांना बरीच प्रतिक्षा करावी लागली. 23व्या मिनिटाला दिल्लीने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. एटीकेने 14 मिनिटांनी बरोबरी साधली. मध्यंतराला ही कोंडी कायम होती. त्यानंतर एटीकेने मार्की स्ट्रायकर रॉबी किन याच्या धडाक्यामुळे पारडे फिरविले. उत्तरार्धात रॉबीने सहा मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. त्यामुळे एटीकेला 3-1 अशी उपयुक्त आघाडी मिळाली.
दिल्लीने यास जोरदार प्रत्यूत्तर दिले. दिल्लीने तीन मिनिटांत दोन गोल केले. त्यामुळे पुन्हा बरोबरी निर्माण झाली. मोक्याच्या क्षणी एटीकेला बचाव करता आला नाही.
निकाल :
दिल्ली डायनॅमोज : 4 (कालू उचे 23, 69, सैत्यसेन सिंग 71, मॅटीयस मिराबाजे 90-1) विजयी विरुद्ध एटीके : 3 (सिबोंगाकोंके एमम्बाथा 37, रॉबी कीन 52, 58)