बेंगळुरू । बेंगळुरू एफसीच्या सुनील छेत्री याचा अपवाद सोडल्यास हिरो इंडियन सुपर लिगमध्ये भारतीय स्ट्रायकरमध्ये चेन्नईयीन एफसीच्या जेजे लालपेखलुआ याच्याइतका प्रभाव इतर कुणाचा पडलेला नाही. जेजेने त्याच्या फ्रँचायजीसाठी आर्थिक मोबदल्याच्या निकषावर पैसा वसूल खेळ केला आहे. यंदा बॅडपॅचनंतर त्याला योग्य वेळी फॉर्म गवसला. त्याबरोबरच त्याने टीकाकारांना चोख प्रत्यूत्तर दिले.
जेजेने यंदाच्या मोसमात नऊ गोल केले आहेत. शनिवारी श्री कांतिरवा स्टेडियमवर तो बेंगळुरूविरुद्ध चेन्नईच्या आघाडी फळीचे नेतृत्व करेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्यात एफसी गोवा संघाविरुद्ध दोन गोल करीत त्याने चाहत्यांची शाबासकी पुन्हा मिळविली, पण त्याआधी त्याच्या बाबतीत असे चित्र नव्हते.
मिझोराममध्ये जन्मलेल्या या स्ट्रायकरसाठी यंदाची लिग सर्वोत्तम ठरली आहे, पण काही वेळा त्याच्या फॉर्मविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मोसमाच्या प्रारंभी त्याला सलग तीन सामन्यांत गोल करता आला नाही. मग एटीकेविरुद्ध त्याने दोन गोल केले. यात 90व्या मिनिटाला त्याचा गोल निर्णायक ठरला होता आणि चेन्नईची 3-2 अशी सरशी झाली होती.
टीकाकारांना प्रत्यूत्तर दिल्यानंतर त्याने पुढील आठ सामन्यांत पाच गोल केले. त्यानंतर त्याच्या कामगिरीला ओहोटी लागली. सहा सामन्यांत त्याला एकदाही लक्ष्य गाठता आले नाही. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा टीका होऊ लागली.
प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांनी मात्र त्याच्या क्षमतेविषयी जाहीर विश्वास व्यक्त केला. साहजिकच जेजेचे मनोधैर्य उंचावले. त्यामुळे तो गोव्याविरुद्ध शैलीदार पुनरागमन करू शकला. त्याने दोन गोल केले. गोव्याला तीन गोलांनी गारद करताना चेन्नईने अॅग्रीगेटवर 4-1 असा विजय मिळविला. जेजे याला तो दोन गोल करेल असे आधीच सांगितल्याचे ग्रेगरी यांनी नमूद केले.
ग्रेगरी म्हणाले की, गोव्यात दमट हवामान असूनही जेजेने अथक धावाधाव केली. घरच्या मैदानावरील सामन्यात सुद्धा उत्साही आणि प्रयत्नपूर्वक खेळामुळे त्याची काहीशी दमछाक झाली होती, पण तुम्ही त्याला पाठिंबा देत राहिला तर तो नक्कीच काहीतरी करून दाखवितो.
जेजेला कारकिर्दीच्या प्रारंभी पैलन अॅरोज आणि त्यानंतर धेंपो स्पोर्टस क्लबमध्ये असल्यापासून टीका टाळता आलेली नाही. गोलला ओहोटी लागताच त्याच्यावर टीका होते, पण तो नेहमी जिद्दीच्या जोरावर पुनरागमन करतो.
जेजेने सांगितले की, आमच्या प्रशिक्षकांचा माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. मला त्यांचा विश्वास सार्थ ठरवायचा होता. यंदाचा मोसम प्रदिर्घ आहे. संघ म्हणून आम्ही ध्येय साध्य केले आहे. आता शनिवारी सर्वोच्च महत्त्वाचा सामना आहे आणि त्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.