पुणे | एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमातील आव्हान कायम राखताना एफसी पुणे सिटीचा 4-0 असा धुव्वा उडविला. दोन पेनल्टी सत्कारणी लावतानाच आणखी दोन गोल करीत गोव्याने बहुमोल विजय नोंदविला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर हुकमी स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनासने दोन गोल केले. यात एका पेनल्टीचा समावेश होता, तर मॅन्युएल लँझारोटने पेनल्टीवर गोल करीत खाते उघडले. ह्युगो बौमौसने एका गोलची भर घातली. गोव्याने मोसमात प्रथमच प्रतिस्पर्ध्याला एकही गोल होऊ न देता क्लीन शीट राखण्याचा पराक्रमही केला. यामुळे त्यांच्या बचावातील त्रुटी दूर झाल्याचे सुद्धा दिसून आले. पुण्याच्या मार्सेलिनियोला दोन पिवळ्या कार्डमुळे मैदान सोडावे लागले.
गोव्याने 16 सामन्यांत सातवा विजय मिळविला असून तीन बरोबरी व सहा पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. गोव्याचे 24 गुण झाले. मुंबई सिटी एफसीला (16 सामन्यांतून 23) मागे टाकत गोव्याने एक क्रमांक प्रगती करीत सहावा क्रमांक गाठला. केरळा ब्लास्टर्स (17 सामन्यांतून 25) पाचव्या स्थानावर आहे. पुण्याला 17 सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला असून नऊ विजय व दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 29 गुण आहेत. त्यांचे दुसरे स्थान कायम राहिले.
या लढतीपूर्वी गोव्याला पाच सामन्यांत दहा गोल पत्करावे लागले होते, तसेच चारच गोल करता आले होते. तीन पराभव आणि दोन बरोबरी अशी त्यांची कामगिरी होती. त्यातच दिल्ली डायनॅमोजशी बरोबरी साधावी लागल्यामुळे त्यांच्यावर दडपण आले होते.
मध्यंतराला गोव्याने पेनल्टीच्या जोरावर आघाडी घेतली होती. 26व्या मिनिटाला ह्युगो बौमौसेला आदिल खानने पाडले. त्यामुळे मिळालेली पेनल्टी मॅन्युएल लँझारोटेने सत्कारणी लावली. त्याचा हा स्पर्धेतील नववा गोल ठरला.
उत्तरार्धात गोव्याने धडाका लावला. 47व्या मिनिटाला कोरोमीनासच्या चालीवर ह्युगोने गोल केला. चेंडू विशालच्या हाताला लागून नेटमध्ये गेला. 58व्या मिनिटाला ह्युगोने टाचेच्या मागील बाजूने चेंडू मारत कोरोमीनासला पास दिला. त्यावर कोरोमीनासने अचूक फटका मारला. त्यानंतर सार्थक गोलुईच्या हाताला चेंडू लागल्यामुळे गोव्याला पेनल्टी मिळाली. ती कोरोमीनासने सत्कारणी लावली.
गोव्याने सुरवात सकारात्मक केली. त्यांचे खेळाडू चांगले पास देत होते. पहिला प्रयत्न गोव्यानेच केला. यात लँझारोटेचा पुढाकार होता. आठव्या मिनिटाला त्याने मारलेला चेंडू विशालने अडविला.
11व्या मिनिटाला पुण्याला फ्री-किक मिळाली होती. त्यावर मार्सेलिनीयोने चेंडू मारला. साहिल पन्वरने हेडींग केले, पण चेंडू गोलपोस्टला लागला.
गोव्याने प्रयत्न सुरु ठेवले. 17व्या मिनिटाला लँझारोटेने नेटच्या दिशेने मारलेला चेंडू आदिलने हेडींगकरवी सुरक्षित ठिकाणी घालविला. 19व्या मिनिटाला त्याने केलेल्या प्रयत्नात अचूकता नव्हती. 25व्या मिनिटाला सेरीटॉन फर्नांडीसने आगेकूच करीत ह्युगोला पास दिला, पण आदिलने पुन्हा एकदा अचूक बचाव केला.
पुर्वार्धात तब्बल पाच जणांना कार्ड द्यागली. यात गोव्याच्या प्रोणय हल्दर, अहमद जाहौह व ह्युग बौमौस या तिघांचा, तर पुण्याच्या दिएगो कार्लोस आणि मार्सेलिनीयो या दोघांचा समावेश होता.
निकाल :
एफसी पुणे सिटी : 0 पराभूत विरुद्ध एफसी गोवा : 4
(मॅन्युएल लँझारोटे 28-पेनल्टी, ह्युगो बौमौस 47, फेरॅन कोरोमीनास 58, 65-पेनल्टी)