पुणे। एफसी पुणे सिटीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये आज (10 डिसेंबर) एफसी गोवा संघाशी लढत होणार आहे. मागील सामन्यात झुंजार खेळ करीत पुण्याने विजय मिळविला. गोव्याचा संघ मात्र धडाकेबाज खेळ करीत असल्यामुळे पुण्याची कसोटी लागेल.
गेल्या मोसमात पुण्याने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला होता. त्या तुलनेत हा संघ फार कमी क्षमतेचा वाटत आहे. मागील सामन्यात केरळा ब्लास्टर्सवरील विजयामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. लिगमधील आव्हान राखण्यासाठी मात्र पुण्यासमोर कडवे आव्हान असेल. पुण्याची आगेकूच करण्याची संधी जमतेम आहे. आठ सामन्यांतून त्यांनी 11 गुण मिळविले आहेत. गोवा संघाला चांगली विश्रांती मिळाली असल्यामुळे पुण्यासमोर अग्नीपरीक्षा असेल.
पुण्याचे हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी यांनी सांगितले की, गेल्या मोसमात गोव्याने सर्वाधिक गोल केले होते. ते ज्या पद्धतीचा खेळ करतात ते पाहता बरेच गोल होतात. आम्हाला त्यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी त्यांच्यासमोर आक्रमणाचा धोकाही निर्माण करावा लागेल. काही वेळा प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणणे हा बचावाचा सर्वोत्तम मार्ग असतो.
गोव्याचा संघ किती धोकादायक आहे याची रेड्डी यांना कल्पना आहे. याचे कारण मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांच्याकडून सुत्रे स्विकारल्यानंतर त्यांची पहिली लढत फातोर्डा येथे गोव्याशीच झाली होती. त्यात पुण्याचा 2-4 असा धुव्वा उडाला होता. तो पराभव वेदनादायक होता, पण त्यानंतर पुण्याने थोडी सुधारणा केली आहे.
पुण्याचा बचाव फारसा भक्कम नाही. त्यामुळे गोव्याच्या आक्रमणापासून त्यांना सावध राहावे लागेल. पुण्याविरुद्ध गोलवरील सर्वाधिक 197 शॉट झाले आहेत. त्यांना फक्त एका सामन्यात क्लीन शीट राखता आली आहे. त्यातच पुण्याचे दोन लेफ्टबॅक खेळू शकणार नाहीत. साहील पन्वर निलंबीत आहे, तर लाछुआन्माविया आजारी आहे.
रेड्डी यांना स्ट्रायकर्सकडून फॉर्मची अपेक्षा असेल. मार्सेलिनीयो याने ब्लास्टर्सविरुद्ध निर्णायक गोल केला, पण त्याचा केवळ दोन गोल करता आले आहेत. या स्पर्धेतील ही त्याची सर्वांत खराब कामगिरी आहे.
गोव्याचा संघ 12 दिवसांनंतर मैदानावर उतरेल. त्यामुळे गेल्या दोन सामन्यांच्या तुलनेत खेळाडूंकडून सरस खेळाची अपेक्षा सर्जिओ लॉबेरा यांना असेल. गोव्याला घरच्या मैदानावर बेंगळुरू एफसीविरुद्ध 1-2 असे पराभूत व्हावे लागले. त्यानंतर एटीकेविरुद्ध त्यांची गोलशून्य बरोबरी झाली.
गोव्याचे सहायक प्रशिक्षक जीझस टॅटो यांनी सांगितले की, पुण्याविरुद्धचा सामना कोणत्याही संदर्भात सोपा असणार नाही. मागील सामना त्यांनी जिंकला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. आम्ही गेले काही दिवस खेळलेलो नाही. पुन्हा विजयी मार्गावर येणे हे आमच्यासमोरील आव्हान असेल.
गोव्याचे केवळ नऊ सामने झाले आहेत. जे इतर सर्व संघांच्या तुलनेत किमान एकने कमी आहेत. यानंतरही हा संघ 17 गुणांसह पहिल्या चार जणांत आहे. गोव्यासाठी ह्युगो बौमौस आणि महंमद अली उपल्ध असणे ही चांगली बातमी आहे. ते दोघे निलंबित होते.
सर्वांचे लक्ष स्टार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याच्यावर असेल. त्याने यंदा आठ गोल केले आहेत, पण गेल्या 250 मिनिटांच्या खेळात त्याला लक्ष्य साधता आलेले नाही.
रेड्डी हे आपल्या संघाच्या विजयाचे अचूक नियोजन करणआर की गोवा पहिल्या टप्याप्रमाणेच आपली मोहिम पुन्हा विजयी मार्गावर आणणार याची उत्सुकता असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–रोनाल्डोचे मेस्सीला आव्हान, चाहते आले टेन्शनमध्ये
–ISL 2018: बेंगळुरू-मुंबई यांच्यात बरोबरी