बेंगळुरू | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शनिवारी श्री कांतिरवा स्टेडियमवर बेंगळुरू एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात अंतिम सामना होईल. दोन्ही संघ चांगल्या फॉर्मात असल्यामुळे रंगतदार लढत अपेक्षित आहे.
बेंगळुरू एफसीला पदार्पणात विजेतेपद जिंकून इतिहास घडविण्याची संधी आहे. बेंगळुरूचे पारडे जड मानले जात आहे, पण आयएसएल अंतिम सामन्यात यजमान संघाची सरशी कधीच झालेली नाही हा इतिहास बेंगळुरूच्या चाहत्यांना माहीत आहे. गोवा (2015), केरळा (2016) यांची घोर निराशा झाली होती. आणखी एक मुद्दा म्हणजे साखळी टप्यात गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविलेला संघ 2014 मधील मोसमापासून एकदाही विजेता ठरलेला नाही.
बेंगळुरूच्या चाहत्यांना मात्र या दाक्षिणात्य डर्बीत आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यापासून काहीही रोखू शकणार नाही. ते स्टेडियम दणाणून सोडण्यास आणि सामना संपल्याची शिट्टी वाजेपर्यंत आपल्या संघाला पाठिंबा देण्यास सज्ज झाले आहेत. बेंगळुरूने घरच्या मैदानावर मोहिमेची विजयी सुरवात केली होती. आता ते विजयानेच सांगता करतील अशी चाहत्यांना आशा आहे.
बेंगळुरूचे प्रशिक्षक अल्बर्ट रोका यांनी सांगितले की, एएफसी करंडकामुळे आम्हाला इतर संघांपेक्षा आधी पूर्वतयारी सुरू करावी लागली. आता आम्हाला आणखी एक पाऊल टाकायचे आहे, पण या क्षणापर्यंत मला प्रत्येकाविषयी आनंद वाटतो. चाहत्यांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. शनिवारी फार खडतर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध अवघड सामना आहे. चेन्नईयीनने बराच दर्जा प्रदर्शित केला आहे. मला सोप्या सामन्याची अपेक्षा नाही. हा मोसमातील सर्वाधिक अवघड सामना असेल.
यंदाच्या मोसमात बेंगळुरू लक्षवेधी संघ ठरला आहे. त्यांनी 38 गोल केले, जे गोव्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे आहेत. बेंगळुरूचे वर्चस्व स्पष्टपणे वाढविणारा मुद्दा म्हणजे त्यांचा भक्कम बचाव. त्यांच्याविरुद्ध केवळ 17 गोल झाले आहेत. त्यांचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू याचा बचाव भेदणे प्रतिस्पर्धी संघांसाठी अत्यंत अवघड ठरते आहे. त्यामुळे आणखी एका सामन्यात खेळाचा धडाका कायम राखण्याचा विश्वास बेंगळुरूला वाटत असेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या दहा सामन्यांत अपराजित मालिका राखताना बेंगळुरूने आठ विजय मिळविले आहेत.
अर्थात प्रत्येक मुद्दा बेंगळुरूच्या बाजूने नाही. चेन्नईयीन एफसीला सुद्धा आपल्या संधीविषयी आत्मविश्वास वाटत असेल. त्यांनी साखळीत बेंगळुरूला त्यांच्याच मैदानावर 2-1 असे हरविले होते. त्यावेळी धनपाल गणेशने अंतिम टप्यात केलेला गोल निर्णायक ठरला होता.
जॉन ग्रेगरी यांच्या संघाने आपल्या क्षमतेचे चांगले प्रदर्शन केले आहे. महत्त्वाचे सामने जिंकण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली आहे. उपांत्य फेरीत एफसी गोवा संघाविरुद्ध फेरॅन कोरोमीनास आणि मॅन्युएल लँझारोटे या धोकादायक जोडीची त्यांनी यशस्वी नाकेबंदी केली. आता सुनील छेत्री आणि मिकू यांच्याविरुद्ध याचीच पुनरावृत्ती करण्याची त्यांना आशा आहे. बेंगळुरूचे 38 पैकी 27 गोल या जोडीने केले आहेत.
ग्रेगरी यांनी सांगितले की, आम्ही या सामन्यात बऱ्याच आत्मविश्वासाने उतरत आहोत. आम्ही येथे पूर्वी जिंकलो असल्याची जाणीव आहे. बेंगळुरूला त्यांच्या मैदानावर हरविलेला एकमेव संघ आम्ही नसल्याचेही ठाऊक आहे. बेंगळुरूने संपादन केलेल्या यशाविषयी आम्हाला सर्वोच्च आदर आहे, पण आम्ही चेन्नईयीन आहोत. आम्ही कोणत्याही प्रतिस्पर्ध्याच्या लौकीकासमोर दबून जात नाही.
पूर्वी आयएसएल फायनल खेळलेले आणि आव्हानात्मक परिस्थितीत विजेते ठरलेले खेळाडू संघात असणे ग्रेगरी यांचे सुदैव आहे. मैल्सन आल्वेस, रॅफेल आगुस्टो, जेजे लालपेखलुआ, करणजीत सिंग हे 2015 मधील विजेत्या संघाचे घटक होते. आता गोव्यात केली तशीच कामगिरी बेंगळुरूमध्ये करण्याचा त्यांचा निर्धार आहे.