जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पूर्वार्धात वर्चस्व राखलेल्या जमशेदपूर एफसीला उत्तरार्धात समर्पक प्रत्यूत्तर देत केरळा ब्लास्टर्स एफसीने 2-2 अशी बरोबरी साधली. चार मिनिटे बाकी असेपर्यंत पराभवाच्या छायेत राहिलेल्या ब्लास्टर्सला अनुभवी खेळाडू सी. के. विनीत याच्या गोलमुळे एका गुणाची कमाई करता आली.
जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलाच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा मार्की स्ट्रायकर टीम कॅहील याने तिसऱ्याच मिनिटाला यजमान संघाचे खाते उघडले. त्यानंतर मायकेल सुसैराज याच्या गोलमुळे जमशेदपूरकडे मध्यंतरास 2-0 अशी उपयुक्त आघाडी होती. ब्लास्टर्सने चिवट प्रतिकार कायम ठेवला.
प्रशिक्षक डेव्हिड जेम्स यांनी 68व्या मिनिटाला हालीचरण नर्झारी याच्याऐवजी सैमीनलेन डुंगल याला बदली खेळाडू म्हणून पाचारण केले. त्यांची ही चाल यशस्वी ठरली. डुंगलने दोन्ही गोलांमध्ये योगदान दिले. स्लावीस्ला स्टोयानोविचने पहिला गोल 71व्या मिनिटाला केला.
जमशेदपूरने पाच सामन्यांत चौथी बरोबरी साधली असून त्यांनी एक विजय मिळविला आहे. त्यांचे सात गुण झाले. सरस गोलफरकामुळे (8-6, 2) त्यांनी एटीके (5-6, उणे 1) व मुंबई सिटी एफसी (5-8, उणे 3) यांना मागे टाकत चौथे स्थान गाठले. एफसी गोवा 10 गुणांसह पहिल्या, नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आठ गुणांसह दुसऱ्या, तर बेंगळुरू एफसी 7 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. बेंगळुरूचा गोलफरक (6-2, 4) जमशेदपूरपेक्षा सरस आहे. ब्लास्टर्सने चार सामन्यांत एक विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह सहा गुण मिळवून सातवे स्थान कायम राखले.
जमशेदपूरची सुरवात वेगवान झाली. कॅहीलने पहिल्या गोलची प्रतिक्षा या लढतीत तिसऱ्या मिनिटाला संपुष्टात आणली. आघाडी फळीतील स्पेनचा सहकारी सर्जिओ सिदोंचा याने त्याला उजव्या कोपऱ्यात सुंदर पास दिला. कॅहीलने चपळाईने ताकदवान हेडिंग केले आणि ब्लास्टर्सचा गोलरक्षक नवीन कुमार याला चकविले. त्याच्या गोलनंतर स्थानिक प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
अर्ध्या तासाच्या खेळानंतर जमशेदपूरला डावीकडून थ्रो-ईनची संधी मिळाली. त्यावर ब्लास्टर्सच्या महंमद रकीपच्या ढिलाईमुळे सिदोंचाने सुसैराजला पास दिला. सुसैराजने नेटच्या उजव्या कोपऱ्यात फटका मारताना नवीनला संधी दिली नाही. नवीन झेप टाकूनही चेंडू अडवू शकला नाही.
ब्लास्टर्सला उत्तरार्धात सुवर्णसंधी मिळाली होती. 55व्या मिनिटाला निकोला क्रॅमरेविच याने स्लाविस्ला स्टोयानोविच याला अप्रतिम पास दिला. उजवीकडून चेंडू मिळताच स्टोयानोविच याने घोडदौड सुरु केली, पण जमशेदपूरचा बचावपटू संजय बालमुचू याने त्याला पाडले. परिणामी सी. रामास्वामी श्रीकृष्ण यांनी पेनल्टी स्पॉटकडे इशारा केला. ही पेनल्टी घेण्यासाठी स्टायानोविच पुढे सरसावला. त्याने फटका मारला, पण जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याने अचूक अंदाज घेत झेप टाकली आणि चेंडू त्याच्या ग्लोव्हजना चाटून बाहेर गेला. यानंतर स्थानिक प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आले होते.
64व्या मिनिटाला नवीनची ढिलाई ब्लास्टर्सला सुदैवाने भोवली नाही. सिदोंचाने फ्री कीकवर उजव्या पायाने मारलेला फटका अडविण्यासाठी नवीन आधी पुढे सरसावला, पण अंदाज चुकल्यामुळे तो लगेच मागे गेला. त्यात तो गोलपोस्टपाशी पडला, पण त्याने चेंडू नेटमध्ये जाण्यापासून कसाबसा अडविला. ब्लास्टर्सची खाते उघडण्याची प्रतिक्षा 71व्या मिनिटाला संपुष्टात आली. बदली खेळाडू सैमीनलेन डुंगल याने जमशेदपूरच्या युमनाम राजू याला चकवून मुसंडी मारली. त्यावेळी बॉक्समध्ये पासच्या प्रतिक्षेत असलेल्या स्टोयानोविच याने डाव्या पायाने अप्रतिम फटका मारत सुब्रतला चकविले.
पिछाडी कमी झाल्यानंतर ब्लास्टर्सने आक्रमक खेळ केला. याचे फळ त्यांना चार मिनिटे बाकी असताना मिळाले. ही चाल सुद्धा डुंगल यानेच रचली. यावेळी सुद्धा त्याने राजूला चकवून आगेकूच केली आणि नेटसमोरील विनीतला पास दिला. विनीतने मग अचूक फटक्यावर लक्ष्य साधले.
भरपाई वेळेत डुंगल आणि बालमुचू यांच्यात वाद झाला. चेंडूवरील ताब्यावरून बालमुचूने डुंगलला ढकलले. मग डुंगलनेही प्रत्यूत्तर दिले. त्यामुळे दोघांना यलो कार्डला सामोरे जावे लागले. नंतर डुंगलची जेरी माहमिंगथांगा याच्याशीही चकमक झडली.
महत्त्वाच्या बातम्या:
–चौथ्या वनडेत भारताचा विंडीजवर २२४ धावांनी शानदार विजय
–ज्या खेळाडूसोबत मैदानावरच झाले होते भांडण त्यानेच दिल्या शतकी खेळीच्या रायडूला शुभेच्छा