मार्सेलिनीयो निलंबीत असल्यामुळे आदिल खान याने पुण्याचे नेतृत्व केले. पुण्याने 18 सामन्यांत तिसरी बरोबरी साधली असून नऊ विजय व सहा पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 30 गुण झाले. पुण्याचे गुणतक्त्यातील दुसरे स्थान कायम राहिले. दिल्लीने 18 सामन्यांत चौथी बरोबरी साधली असून पाच विजय व नऊ पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 19 गुण झाले. दिल्लीचे आठवे स्थान कायम राहिले.
सामन्याची सुरवात सनसनाटी झाली. दुसऱ्याच मिनिटाला पुण्याच्या साहील पन्वरला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. त्याने मॅन्युएल अरानाला पाडले. नवव्या मिनिटाला आशिक कुरुनियान याने पेनल्टी क्षेत्रात लालीयनझुला छांगटे याला पाडले. त्यामुळे दिल्लीला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर कालू उचे याने उजवीकडे मारलेला चेंडू पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याला झेप टाकूनही अडविता आला नाही. कालूने सलग आठव्या सामन्यात गोल केला. त्याने एकूण 15 सामन्यांत केलेला हा 12 वा गोल ठरला.
या गोलनंतर दोन मिनिटांत पुण्याला पेनल्टी मिळाली. उजवीकडून मार्को स्टॅन्कोविच याने घोडदौड केली. त्याने मारलेल्या चेंडूवर रॅफेल लोपेझ हेडींग करणार तोच सीमरनजीत सिंगने त्याला पाडले. त्यामुळे पंचांनी पुण्याला पेनल्टी बहाल केली. त्यावर एमिलीयानो अल्फारो याने दिल्लीचा गोलरक्षक अर्णब दास शर्मा याचा अंदाज चुकवित गोल केला.
दिल्लीने 34व्या मिनिटाला आघाडी घेतली. विशालने पास दिल्यानंतर लोपेझचा तोल जाऊन तो घसरून पडला. त्याचवेळी नंदकुमार शेखरने चपळाईने चेंडूवर ताबा मिळवित पेनल्टी क्षेत्रात आगेकूच केली. विशाल त्याच्यासमोरच होता. त्यामुळे नंदकुमारने धुर्तपणे कालूला पास दिला. मग कालूने मोकळ्या नेटमध्ये चेंडू मारत वैयक्तिक व संघाचाही दुसरा गोल नोंदविला.
यानंतर दोन्ही संघांनी बरेच प्रयत्न केले, पण त्यांना यश येत नव्हते. अंतिम टप्यात अल्फारोने आगेकूच केली असताना महंमद धोट व सिमरनजीत यांनी त्याची कोंडी केली. त्यातच महंमदने अल्फारोला पाडले. त्यामुळे पुण्याला पेनल्टी मिळाली. अल्फारोचा ताकदवान फटक्यावर मारलेला चेंडू अर्णबच्या हाताला लागून नेटमध्ये गेला.
निकाल :
दिल्ली डायनॅमोज एफसी : 2 (कालू उचे 10-पेनल्टी, 34) बरोबरी विरुद्ध
एफसी पुणे सिटी : 2 (एमिलीयानो अल्फारो 13-पेनल्टी, 86-पेनल्टी)