बेंगळुरू। इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गतउपविजेत्या बेंगळुरू एफसीने अपराजित मालिका कायम राखली. श्री कांतीरवा स्टेडियमवर बेंगळुरूने आज झालेल्या ( 30 नोव्हेंबर) सामन्यात एफसी पुणे सिटीवर 2-1 अशी मात केली. पुर्वार्धात स्वयंगोल झालेल्या राहुल भेके याने भरपाई केली. त्याने केवळ दोन मिनिटे बाकी असताना गोल केला.
याबरोबरच बेंगळुरूने आठ सामन्यांत सातवा विजय मिळविला असून त्यांना एकमेव बरोबरी साधावी लागली आहे. त्यांचे सर्वाधिक 22 गुण झाले. दुसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवा संघावर त्यांनी पाच गुणांची आघाडी घेतली आहे. गोव्याने नऊ सामन्यांतून 17 गुण मिळविले आहेत. पुणे सिटीला 10 सामन्यांत सातवा पराभव पत्करावा लागला. एक विजय, दोन बरोबरींसह त्यांचे पाच गुण व नववे स्थान कायम राहिले.
दोन मिनिटे बाकी असताना निशू कुमारने मध्य रेषेपाशी चेंडूवर ताबा मिळविला. त्याने उजवीकडे हर्मनज्योत खाब्राला पास दिला. खाब्राने पायाने चेंडू नेटसमोर अचूकतेने मारत निर्माण केलेली संधी भेकेने साधली. त्यावेळी नेट मोकळे होते. हाच गोल निर्णायक ठरला.
अपेक्षेप्रमाणे बेंगळुरूने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. उजवीकडून डिमास डेल्गाडोने चाल रचत खाब्राला पास दिला. त्याने चेंडूवर ताबा मिळवित अंदाज घेतला. तोपर्यंत उदांताने बॉक्समध्ये प्रवेश केला होता. पास मिळताच त्याने प्रतिस्पर्ध्यांना चकवित डाव्या पायाने शानदार फटका मारत लक्ष्य साधले.
पुणे सिटीने अनपेक्षितपणे बरोबरी साधली. प्रतिआक्रमण रचत मार्सेलिनीयोने मार्का स्टॅन्कोविच याच्याकडे चेंडू सोपविला. मार्कोने उजवीकडून मैदानालगत फटका मारला. रॉबिन सिंगला पास देण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याचवेळी भेकेने पायाने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. चेंडू नेटमध्ये गेला आणि अखेरीस स्वयंगोल झाला.
पुर्वार्धात 13व्या मिनिटाला बेंगळूरूचा दुसरा गोल थोडक्यात हुकला. डेल्गाडोने चेंचो गील्टशेनला पास दिला. चेंचोने पुण्याचा गोलरक्षक कमलजीतवर दडपण आणले होत. त्याने नेटच्या उजवीकडे फटका मारला, पण कमलजीतने पायाने चेंडू अडविला. 18व्या मिनिटाला झिस्को हर्नांडेझ याला बॉक्सबाहेर चेंडू मिळाला. मार्किंग नसल्याचे लक्षात येताच त्याने डाव्या पायाने जोरदार फटका मारला, पण चेंडू नेटच्या उजवीकडून बाहेर गेला. तीन मिनिटांनी झिस्कोने डावीकडून पास दिल्यावर चेंचोला मार्गिंग नव्हते. तो सहा यार्ड बॉक्सपाशी होता. त्याने हेडिंग केले, पण चेंडू क्रॉसबारला लागला.
बेंगळुरूने 26व्या मिनिटाला प्रतिआक्रमण रचले. एरीक पार्टालूने हेडिंग केल्यानंतर चेंडू उदांतापाशी गेला. उजवीकडून उदांताने पलिकडील बाजूस छेत्रीच्या दिशेने फटका मारला. छेत्रीने झिस्कोकडे चटकन पास देत पुढे धावण्यास सुरवात केली. झिस्कोने चेंडूकडे चेंडू सोपविला. झिस्कोने छेत्रीसाठी डमी बनण्याचा पवित्रा घेतला. प्रत्यक्ष फटका छेत्रीने डाव्या पायाने मारला, पण कमलजीतने चपळाईने नेट सुरक्षित राखले. त्यानंतर पुर्वार्धात निशू कुमार, चेंचो, पार्टालू यांचे प्रयत्न फिनिशींगअभावी यशस्वी ठरले नाहीत. मध्यंतरास 1-1 अशी बरोबरी होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: नवख्या चीनने इंग्लंडला बरोबरीत रोखले
–श्रीलंका संघात या दोन खेळाडूंचे झाले एक वर्षांनंतर पुनरागमन
–विंडीजचा हा गोलंदाज इंग्लंड संघाकडून खेळण्यास सज्ज, विश्वचषकाचेही स्वप्न होऊ शकते पूर्ण