चेन्नई | हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात आक्रमणाच्या क्षमतेचा निकष लावल्यास चेन्नईयीन एफसीचा दबदबा दिसून येणार नाही. चेन्नईने साखळी टप्यात केवळ 24 गोल केले आहेत. एफसी गोवा (42), बेंगळुरू एफसी (35) आणि एफसी पुणे सिटी (30) यांच्या तुलनेत हे प्रमाण फार कमी आहे. यानंतरही अष्टपैलू सांघिक कामगिरीची क्षमता हे चेन्नईचे बलस्थान आहे.
आयएसएल जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या संघांना चेन्नईचा दरारा वाटण्याचे हेच कारण आहे. मैदानावरील त्यांच्या प्रत्येक खेळाडूने गोल केला आहे हा मुद्दा सुरवातीलाच नमूद करावा लागेल. खरे तर यंदा 11 वेगवेगळ्या खेळाडूंनी चेन्नईसाठी गोल केले आहेत. इतर कोणत्याही संघाला अशी कामगिरी करून दाखविता आलेली नाही.
एफसी गोवा संघ फेरॅन कोरोमीनास आणि मॅन्युएल लँझारोटे या स्पेनच्या जोडीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या दोघांनी मिळून 30 गोल केले आहेत. पुण्याची मदार मार्सेलिनियो आणि एमिलियानो अल्फारो यांच्यावर राहिली आहे, तर बेंगळुरू एफसीच्या बाबतीत मिकू आणि सुनील छेत्री यांचा उल्लेख करावा लागेल. दुसरीकडे चेन्नईने दाखवून दिले आहे की संघाच्या गरजेनुसार प्रत्येक वेळी पुढाकार घेतलेले खेळाडू साखळीत त्यांच्याकडे होते.
गोव्याविरुद्ध महत्त्वाच्या उपांत्य फेरीपूर्वी जेजे लालपेखलुआ म्हणाला की, आमच्यासाठी संघातील सर्वांकडून गोल झाले आहेत. आघाडी फळीला शक्य झाले नाही तेव्हा मैदानावरील इतर भागांतील खेळाडूंनी योगदान दिले. पुण्याविरुद्ध हेन्रीक सेरेनो याने हेडींगवर निर्णायक गोल केला. बेंगळुरूविरुद्ध हेच धनपाल गणेशने केले. इनिगो कॅल्डेरॉन आणि मैल्सन आल्वेस यांनी सुद्धा वाटा उचलला. त्याचप्रमाणे रॅफेल आगुस्टो, रेने मिहेलीच, महंमद रफी, ग्रेगरी नेल्सन, फ्रान्सिस फर्नांडीस आणि अनिरुद्ध थापा यांच्यामुळे क्लबसाठी गोल केलेल्या खेळाडूंच्या यादीचा विस्तार झाला आहे.
मिझोरामच्या जेजे याने स्वतः सात गोल केले आहेत. चेन्नईच्या अष्टपैलू कामगिरीचे मुख्य कारण म्हणजे भक्कम तंदुरुस्ती आणि खंबीर मनोधैर्य. त्यामुळेच प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत हे त्यांचे बलस्थान ठरते. पिछाडीवर पडल्यानंतर बहुतेक वेळा चेन्नईने प्रतिआक्रमण रचले आहे. याचे कारण कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध गोल करण्याची क्षमता असल्याचा विश्वास त्यांच्याकडे आहे.
जेजेने पुढे सांगितले की, आगुस्टोला दुखापत झाली तेव्हा रेने पुढे आला आणि त्याने अपेक्षित कामगिरी केली. सेरेनो निलंबीत झाला तेव्हा धनचंद्र सिंग याने पर्याय निर्माण केला. यंदाच्या मोसमात राखीव फळीची क्षमता चांगली आहे.
चेन्नईची मोसमात केवळ दोन वेळाच नाकेबंदी झाली. यात मुंबईत मुंबई सिटीविरुद्ध 0-1, तर कोचीमध्ये केरळा ब्लास्टर्सविरुद्ध गोलशून्य बरोबरी असे प्रतिकूल निकाल लागले.
चेन्नईचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांनी सांगितले की, आमचे वैद्यकीय दल अप्रतिम आहे. स्पोर्टस सायन्स विभागाचे प्रमुख नियाल क्लार्क प्रत्येकाला तंदुरुस्त ठेवतात. राखीव फळीसाठी निवड करतानाही माझ्यासमोर पेच निर्माण होतो. पाठोपाठ सामने होत असताना आम्ही ज्या पद्धतीने खेळाडूंची काळजी घेऊन त्यांना सज्ज ठेवत असल्याचीच पावती यातून मिळते.
चेन्नईने नोंदणी केलेल्या 25 पैकी 24 खेळाडूंना संधी दिली आहे. तिसऱ्या पसंतीचा गोलरक्षक शाहीनलाल मेलोली यालाच यंदा पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
ग्रेगरी यांनी पुढे सांगितले की, आम्ही खेळाडूंच्या शारिरीक स्थिती तसेच प्रत्येक गोष्टीकडे नेहमीच बारकाईने लक्ष देतो. आमचे खेळाडू कोणत्या स्थितीत आहेत याची आम्हाला कल्पना असते. संधी मिळते तेव्हा आम्ही त्यांना विश्रांती देतो.
आणखी एक लक्षवेधी मुद्दा म्हणजे चेन्नईने बहुतांश गोल शेवटच्या 15 मिनिटांत केले आहेत. 24 पैकी 11 गोल 75 मिनिटांच्या खेळानंतर झाले आहेत. यावरून लिगमधील सर्वाधिक तंदुरुस्त संघांमध्ये त्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट होते.
गोव्याविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी ग्रेगरी यांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. पूर्ण 90 मिनिटे शंभर टक्के क्षमता राखून खेळणे आपल्या संघाला शक्य असून मैदानात सर्वत्र गोल करणारे खेळाडू असल्याची त्यांना कल्पना आहे.