---Advertisement---

ISL 2019- ब्लास्टर्स घरच्या मैदानावर मुंबईविरुद्ध पराभूत

On: शुक्रवार, ऑक्टोबर 25, 2019 10:44 AM
---Advertisement---
कोची |  मुंबई सिटी एफसीने सहाव्या हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शानदार सलामी दिली. केरला ब्लास्टर्स एफसीला एकमेव गोलच्या जोरावर हरवित मुंबईने निर्णायक विजयाचे तीन गुण मिळविले. घरच्या मैदानावर माजी विजेत्या एटीकेला हरवून जोरदार प्रारंभ केलेल्या ब्लास्टर्सची गाडी दुसऱ्याच सामन्यात घसरली. आठ मिनिटे बाकी असताना ट्युनिशियाचा अमीने चेर्मिटी याने केलेला गोल मुंबईसाठी निर्णायक, तर ब्लास्टर्ससाठी निराशाजनक ठरला.

पोर्तुगालच्या जोर्गे कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने कोचीला त्यांच्याच मैदानावर 28 हजार 445 प्रेक्षकांमधील बहुसंख्य समर्थकांच्या साक्षीने हरविले. गत मोसात मुंबईने तिसऱ्या क्रमांकासह बाद फेरी गाठली होती. यावेळी त्यांनी फॉर्म कायम राखला.

आठ मिनिटे बाकी असताना मुंबईचा बचावपटू सौविक चक्रवर्ती याने ब्लास्टर्सच्या ढिसाळ बचावाचा फायदा उठवित मैदानालगत अमीनेला पास दिला. अमीनेलाही मार्किंग नव्हते आणि त्याने ब्लास्टर्सचा गोलरक्षक बिलाल हुसेन खान याला आरामात चकविले. दोनच मिनिटांनी मुंबईचा बदली खेळाडू सर्जी केव्हीन याला गोलजवळील चुरशीत संधी मिळाली होती, पण बिलालने चेंडू कसाबसा अडविला.

सामन्याची सुरवात नाट्यमय झाली. पाचव्याच मिनिटाला मुंबईचा फॉरवर्ड अमीने चेर्मीटी याने आगेकूच केली. त्याला बचावपटू शुभाशिष बोस याने अप्रतिम पास दिला होता. त्याने चेंडूवर व्यवस्थित ताबा मिळविला असतानाच मागून ब्लास्टर्सच्या जियान्नी झुईवर्लून याने त्याला पाडले. त्यावेळी मैदानावर पडलेल्या अमीनेसह मुंबईच्या खेळाडूंनी पेनल्टीचे जोरदार अपील केले, पण पंच एल. अजित मेतेईल यांनी ते फेटाळून लावले.

दहाव्या मिनिटाला रॉलीन बोर्जेसचा अप्रतिम पास बॉक्सच्या उजवीकडे मिळाल्यानंतर दिएगो कार्लोसने पलीकडील बाजूला फटका मारला. त्यावर महंमद लार्बीने प्रतिस्पर्ध्याला चकवित उडी घेत हेडींग केले, पण ते स्वैर होते.

सुरवातीला ब्लास्टर्सचा चेंडूवर जास्त ताबा होता, पण मुंबई सिटीचे प्रयत्न सरस होते. त्यांचे पासिंग सरस होते आणि त्यांनी मोकळ्या जागा हेरत आगेकूच केली, पण त्यांना चांगली संधी निर्माण करता आली नाही. 19व्या मिनिटाला पाऊलो मॅचादोने उजवीकडून कार्लोसकरीता संधी निर्माण केली. नेटच्या दिशेने फटका मारण्याचा कोन अवघड असूनही कार्लोसने ताकद लावली. ब्लास्टर्सचा गोलरक्षक बिलाल हुसेन खान याने चेंडू थोपवित बाहेर घालविला. त्यामुळे मिळालेला कॉर्नर मात्र फलदायी ठरला नाही.

ब्लास्टर्सला 24व्या मिनिटाला मैदानाच्या डावीकडे फ्री किक मिळाली. सर्जिओ सिदोंचाने त्यावर पेनल्टी क्षेत्रात छान फटका मारला. त्यावर बार्थोलोम्यू ओगबेचेने मार्करला चकवित उडी घेत हेडिंग केले, पण तो लक्ष्य गाठू शकला नाही.

पूर्वार्धाच्या अंतिम टप्यात दोन्ही संघांनी उल्लेखनीय प्रयत्न केले. त्यात 36व्या मिनिटाला लार्बीने उजवीकडून दिलेल्या पासवर कार्लोसने आगेकूच करत क्रॉस शॉट मारला, पण चेंडू जियान्नी झुईवर्लूनच्या डोक्याला लागून बाहेर गेला. त्यावर मिळालेला कॉर्नर मात्र फलदायी ठरला नाही.

शेवटच्या दोन मिनिटांत ब्लास्टर्सने दमदार प्रयत्न केले. 44व्या मिनिटाला डावीकडून मिळालेल्या फ्री किकवर पलिकडील बाजूला चेंडू येताच जैरो रॉड्रीग्जने उडी घेत हेडिंग केले, पण मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंगने खाली वाकत चेंडू बाजूला घालविला. मग लार्बीने किक मारत तो मैदानाबाहेर घालविला. परिणामी ब्लास्टर्सला कॉर्नर मिळाला. त्यावर रॉड्रीग्जने हेडिंग केले. चेंडू मोहमदौ गनिंगच्या डोक्याजवळून नेटमध्ये गेला, पण त्यावेळी मोहमदौचा हात चुकून वर गेला आणि चेंडूला लागला. त्यामुळे पंच ए. अजित मेतेई यांना त्याला यलो कार्ड दाखविले.

पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी होती. मुंबई सिटीने 42व्या मिनिटालाच मोडोऊ सौगौ आणि प्रतिक चौधरी यांना पाऊलो मॅचादो आणि मॅटो ग्रजिच यांच्याऐवजी पाचारण केले होते.

दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी उपयुक्त चालींसाठी झगडावे लागले. 50व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा मध्यरक्षक मोहमदौने प्रतिस्पर्ध्याला रोखत चेंडूवर ताबा मिळविला. त्याने पास दिल्यानंतर मात्र हालीचरण नर्झारीला योजनाबद्ध आगेकूच करू शकला नाही. तीन मिनिटांनी मुंबईच्या लार्बीने अमीनेला डावीकडून दिलेल्या पासवर फिनीशिंग होऊ शकले नाही. चेंडू त्याच्या पायाला लागून मोडोऊ सौगौकडे गेला, पण सौगौचा फटकाही स्वैर होता.

त्यानंतर डावीकडील फ्री किकवर मुंबईच्या शुभाशिष बोसला हेडिंगमध्ये जोर लावता आला नाही. त्यामुळे बिलालाने चेंडू आरामात अडविला. भरपाई वेळेत ब्लास्टर्सच्या साहल अब्दुल समदच्या पासवर ओगबेचेने केलेला ताकदवान प्रयत्न अमरिंदरने अपयशी ठरविला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---