गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) मंगळवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने संभाव्य विजेत्या बंगळुरू एफसीला 2-2 असे बरोबरीत रोखले. चौथ्याच मिनिटाला खाते उघडलेला पोर्तुगालचा 28 वर्षीय स्ट्रायकर लुईस मॅचादो याने नॉर्थईस्टला बरोबरीही साधून दिली. याबरोबरच जेरार्ड न्यूस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या अपराजित नॉर्थईस्टने गुणतक्त्यात दुसरा क्रमांक गाठला.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर ही लढत झाली. बंगळुरूकडून बचाव फळीतील स्पेनचा 33 वर्षीय खेळाडू जुआनन व आघाडी फळीतील मणीपूरचा 24 वर्षीय बदली खेळाडू उदांता सिंग यांनी गोल केले. उदांताच्या गोलमुळे बंगळुरूला आघाडी मिळाली होती, पण त्यांना ती राखता आली नाही. बंगळुरूची अपराजित मालिका कायम राहिली असली, तरी त्यांची दुसऱ्या विजयाची प्रतिक्षा लांबली.
नॉर्थईस्टचे 5 सामन्यांतून 9 गुण झाले. आघाडीवरील मुंबई सिटी एफसी आणि एटीके मोहन बागान यांच्याप्रमाणेच त्यांचे 9 गुण आहेत. यात मुंबई सिटीने 5 (6-1) अशा सरस गोलफरकामुळे आघाडी राखली. एटीकेएमबी तिसऱ्या क्रमांकावर गेला. त्यांचा गोलफरक 3 (5-2) आहे. नॉर्थईस्टचाही गोलफरक 3 (8-5) असा समान आहे, पण नॉर्थईस्टचे गोल जास्त आहेत. त्यामुळे नॉर्थईस्टला दुसरा क्रमांक मिळाला.
बंगळुरूला ४ सामन्यांत तिसरी बरोबरी पत्करावी लागली असून एकमेव विजयासह त्यांचे सहा गुण झाले. एफसी गोवाला (4 सामन्यांतून 5) मागे टाकत बेंगळुरूने एक क्रमांक प्रगती केली. त्यांनी पाचवरून चौथे स्थान गाठले.
खाते उघडण्याची शर्यत नॉर्थईस्टने जिंकली. चौथ्याच मिनिटाला स्ट्रायकर लुईस मॅचादो याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवून आघाडी फळीतील सहकारी सुहैर वडाक्केपीडीका याला उजवीकडे अप्रतिम पास दिला. सुहैरने डाव्या बाजूला असलेल्या रोछार्जेला याच्या दिशेने चेंडू मारला. रोछार्झेलाने गोलक्षेत्रात प्रवेश करीत डाव्या पायाने मारलेला चेंडू जुआनन याच्या बूटाला लागून मॅचादोच्या पायाला स्पर्श करीत नेटमध्ये गेला. तोपर्यंत बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू चकला होता.
बंगळुरूने 13व्या मिनिटाला बरोबरी साधली. बचाव फळीतील राहुल भेकने लांब थ्रो-इनवर चेंडू गोलक्षेत्रात टाकला. नॉर्थईस्टच्या बचाव फळीतील बेंजामी लँबोट आणि डायलन फॉक्स यांच्यामध्ये हा चेंडू पडला. अचानक उसळलेला चेंडू फॉक्सच्या शरीराला लागून जुआनन याच्या पायापाशी गेला. जुआनन याने मग नॉर्थईस्टचा गोलरक्षक गुरमीत याला चकवित चेंडू नेटमध्ये मारला.
मध्यंतराच्या 1-1 अशा बरोबरीनंतर बंगळुरूने 71व्या मिनिटाला आघाडी घेतली. सुनील छेत्रीने डावीकडून हेडिंग केलेला चेंडू नॉर्थईस्टच्या डायलन फॉक्स याच्या बाजूने नेटपाशी गेला. त्यावेळी उदांताने ऍक्शनचा अंदाज घेत वेगाने धावत येत प्रतिस्पर्धी गोलरक्षक गुरमीतला चकवून चेंडू नेटमध्ये मारला.
त्यानंतर मॅचादोने नॉर्थईस्टला बरोबरी साधून दिली. डावीकडून त्याने मुसंडी मारली. त्यावेळी त्याला रोखताना बंगळुरूचा बचावपटू जुआनन पडला. त्यामुळे मॅचादोने शानदार फिनिशींग केले.
पूर्वार्धात 17व्या मिनिटाला बंगळुरूला कॉर्नर मिळाला. स्ट्रायकर आशिक कुरुनीयन याने डावीकडून गोलक्षेत्रात चेंडू मारला, जो ब्लॉक होऊन बाहेर गेल्याने आणखी एक कॉर्नर मिळाला. डिमास डेल्गाडोने मारलेला चेंडू गुरमीतने पुढे सरसावत चेंडू थोपवला. त्यानंतर बंगळुरूचा मध्यरक्षक सुरेश वांगजाम याने प्रयत्न केला, पण त्याचा फटका स्वैर होता.
पुढे 26व्या मिनिटाला सुनील छेत्रीच्या थ्रो-ईनवर कुरुनीयन याने गोलक्षेत्रात मुसंडी मारली. त्याने निर्माण केलेल्या संधीचे मात्र हरमनज्योत खाब्राला फिनिशींग करता आले नाही. खाब्रा पुरेशा ताकदीने चेंडू मारू शकला नाही.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभीच नॉर्थईस्टचा बचावपटू गुरजिंदर कुमार याच्या ढिसाळ पासमुळे फॉक्सच्या मार्गाने जाणाऱ्या चेंडूवर क्लेईटन सिल्वा ताबा मिळवू शकला. सिल्वाला संधी होती, पण त्याने स्वैर फटका मारला.
त्यानंतर 49व्या मिनिटाला बंगळुरूला मिळालेला कॉर्नर कुरुनीयन याने घेतला. त्याने डावीकडून मारलेला चेंडू नॉर्थईस्टचा बचावपटू आशुतोष मेहता याने थोपवला, पण चेंडू बाहेर गेल्याने पुन्हा कॉर्नरचा इशारा झाला. त्यावर बंगळुरूला काही करता आले नाही.
तसेच 59व्या मिनिटाला जुआनन याने सुहैर याची चाल रोखली. 62व्या मिनिटाला सुनील छेत्रीचा प्रयत्न नॉर्थईस्टचा मध्यरक्षक खासा कमारा याने फोल ठरवला.