गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) एफसी गोवा संघाने मध्यंतराच्या पिछाडीवरून जमशेदपूर एफसीवर 2-1 अशी मात केली. आघाडी फळीतील स्पेनच्या 36 वर्षीय इगोर अँग्युलोने पेनल्टीवरील गोलसह बरोबरी आणि भरपाई वेळेत सनसनाटी विजयी गोल करत गोव्याचा संस्मरणीय विजय साकार केला.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. पहिल्या सत्रात जमशेदपूरचे खाते बचाव फळीतील नायजेरियाच्या 26 वर्षीय स्टीफन इझे याने उघडले. मध्यंतरास जमशेदपूरकडे या गोलची आघाडी होती. दुसऱ्या सत्रात गोव्याला अँग्युलोने पेनल्टीवर बरोबरी साधून दिली. त्यानंतर मुळ चार मिनिटांच्या भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटाला गोव्याला कॉर्नर मिळाला. एदू बेदीयाने घेतलेल्या कॉर्नरवर अँग्युलोने लक्ष्य साधले.
याबरोबरच अँग्युलोचे आठ सामन्यांत आठ गोल झाले. प्रतिस्पर्धी संघातील स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीस याला त्याने मागे टाकले. वॅल्सकीसचे सात सामन्यांत सहा गोल आहेत.
गोव्याचा हा 8 सामन्यांतील तिसरा विजय असून दोन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 11 गुण झाले. चौथ्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला त्यांनी गुणांवर गाठले. मात्र, नॉर्थईस्टचा 2 (10-8) असा गोलफरक गोव्याच्या 1 (10-9) गोलफरकापेक्षा सरस ठरला. त्यामुळे नॉर्थईस्टचे चौथे स्थान कायम राहिले. गोव्याने सातवरून दोन क्रमांक प्रगती करीत पाचवे स्थान गाठले.
जमशेदपूरची एक क्रमांक घसरण झाली. त्यांचा आता सहावा क्रमांक आहे. 8 सामन्यांत दोन विजय, 2 बरोबरी व 2 पराभव अशा कामगिरीसह जमशेदपूरचे दहा गुण कायम राहिले. गोव्याला मागील दोन सामन्यांत पराभूत व्हावे लागले होते. एटीके मोहन बागान आणि चेन्नईयन एफसी यांच्याकडून ते हरले होते. मात्र, या विजयासह गोव्याने संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीमधील आपले स्थान उंचावले.
मुंबई सिटी एफसी सात सामन्यांतून 16 गुणांसह सरस गोलफरकामुळे आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानचेही सात सामन्यांतून 16 गुण आहेत. यात मुंबईचा 8 (11-3) गोलफरक एटीकेएमबीच्या 5 (8-3) गोलफरकापेक्षा तीनने सरस आहे. बेंगळुरू एफसी सात सामन्यांतून 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पुढे 33व्या मिनिटाला जमशेदपूरला फ्री किक मिळाली. मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याने गोलक्षेत्रात खोलवर मारलेल्या ताकदवान फटक्याला नेटची दिशा दिली. त्यावेळी गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याला चेंडूचा अंदाज घेता आला नाही.
दुसऱ्या सत्रात एकूण तासाभराच्या खेळानंतर जमशेदपूरच्या मध्यरक्षक अलेक्झांड्रे लिमा याने गोलक्षेत्रात गोव्याचा बचावपटू जेम्स डोनाची याला पाठीमागून धडक देत पाडले. त्यामुळे रेफरी ए रोवन यांनी गोव्याला पेनल्टी बहाल केली. त्यावर अँग्युलोने शांतचित्ताने फटका मारत जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याला चकवले.
सामन्याची सुरुवात वेगाने झाली. तिसऱ्याच मिनिटाला प्रीन्सटन रिबेलो याने नेरीयूस वॅल्सकीसच्या दबावामुळे चेंडूवरील ताबा गमावला. त्यानंतर जेम्स डोनाचीने वॅल्सकीसला पाडले. तोपर्यंत काहीही नियमबाह्य न घडल्यामुळे रेफरी ए. रोवन यांनी खेळ पुढे सुरु ठेवला. चेंडू अनिकेत जाधवजवळ येताच त्याने उजवीकडून घोडदौड करत क्रॉस शॉट मारला, पण रोमारीओ जेसुराजने गोव्याचे क्षेत्र सुरक्षित राखले.
सहाव्या मिनिटाला इव्हान गोंझालेझने वॅल्सकीसला गोलक्षेत्रालगत पाडल्यामुळे जमशेदपूरला फ्री किक देण्यात आली. मॉनरॉयने फ्री किक घेतली, पण त्याला सफाईदार फटका मारता आला नाही. हा चेंडू अँग्युलोने हेडिंग करीत बाजूला घालवला.
त्यानंतर 21व्या मिनिटाला जमशेदपूरला कॉर्नर मिळाला होता. अनिकेत जाधवने आगेकूच केल्यानंतर त्याला एदू बेदीयाने रोखले आणि चेंडू बाहेर घालवला. त्यामुळे मिळालेला कॉर्नर मॉनरॉयने घेतला, पण त्याने प्रतिस्पर्धी गोलरक्षक नवाझ याच्या अगदी जवळ चेंडू मारला. नवाझने हाताने चेंडू बाजूला घालवला.
पूर्वार्ध संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना वॅल्सकीसने प्रयत्न केला, पण त्याचा फटका स्वैर होता. दुसऱ्या सत्रात 52व्या मिनिटाला इसाक वनमाल्साव्मा याने उजवीकडून कौशल्याने आगेकूच करीत जॅकीचंद सिंगला पास दिला. त्यातून अनिकेतला चेंडू मिळाला. गोव्याच्या खेळाडूंचे दडपण असूनही अनिकेतने फटका मारला, पण नवाझने चेंडू थोपवला.
सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना लिमाच्या चालीचा अंदाज घेत वॅल्सकीसने पास दिला. लिमाने मारलेला फटका गोलपोस्टच्या खाली लागून चेंडू बाहेर आला, पण लाईनमन स्तब्ध राहिल्यामुळे गोल झाला नसल्याचे स्पष्ट झाले.