गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) मंगळवारी (२२ डिसेंबर) बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर ओडिशा एफसीसमोर पहिल्या विजयासाठी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचे आव्हान असेल.
ओडिशाला आतापर्यंत सहा सामन्यांत एकच गुण मिळवता आला आहे. पहिल्या विजयासाठी त्यांची प्रतिक्षा कायम आहे. भुवनेश्वरचा हा संघ 11 संघांमध्ये तळात आहे. त्यांना सलग पाच पराभव पत्करावे लागले आहेत, जे मोसमात सर्वाधिक प्रमाण ठरले आहे. चौथ्या क्रमांकावरील नॉर्थईस्टच्या रुपाने त्यांना कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
नॉर्थईस्टची अपराजित मालिका मागील लढतीत संपुष्टात आली. त्यामुळे आता विजयी मार्गावर परतण्याचा त्यांचा निर्धार असेल. ओडिशाला लवकरच फॉर्म मिळवणे अनिवार्य असेल. आक्रमणासह बचावातही त्यांना झगडावे लागत आहे. त्यांना नऊ गोल पत्करावे लागले आहेत, जी दुसऱ्या क्रमांकाची प्रतिकूल कामगिरी आहे. यातील सात गोल पहिल्या सत्रात झाले आहेत. यावरून आधीच गोल पत्करावा लागण्याची समस्या त्यांना भेडसावत असल्याचे स्पष्ट होते. आक्रमणातही स्टुअर्ट बॅक्सटर यांच्या संघाला अपयश आले असून त्यांना तीनच गोल करता आले आहेत, जे निचांकी प्रमाण आहे. याशिवाय त्यांना केवळ 42 संधी निर्माण करता आल्या आहेत.
आधी गोल पत्करून पहिल्याच सत्रात लय विस्कळीत होऊ नये म्हणून ओडिशाला खबरदारी घ्यावी लागेल. त्यासाठी त्यांना प्रतिस्पर्धी स्ट्रायकर इद्रिसा स्यीला आणि क्वेसी अप्पीया यांच्यावर करडी नजर ठेवावी लागेल. या दोघांनी प्रत्येकी दोन गोल केले असून नॉर्थईस्टतर्फे ते आघाडीवर आहेत.
बॅक्सटर यांनी सांगितले की, ‘नॉर्थईस्टच्या संघात वेगवान खेळ करणारे बरेच खेळाडू आहेत. पिछाडीवरून आघाडीवर वेगाने घोडदौड करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. ते आघाडी फळीतील सहकाऱ्यांना चेंडू पुरवतात. संघ म्हणून ते बचाव करतात. आम्ही जी काही योजना आखू ती सांघिक पातळीवरची असेल. एकाच खेळाडूचे जोरदार मार्किंग करण्यावर त्यात भर नसेल. एकमेकांना साथ देणे आणि ते चालींसाठी मोकळीक मिळवत असतील, तर त्यांना जिद्दीने रोखण्यावर आमचा भर असेल. त्याद्वारे आम्ही प्रतिस्पर्ध्यावर नियंत्रण ठेवू शकू.’
नॉर्थईस्टसमोर अशाच समस्या आहेत. त्यांच्याविरुद्ध सहा पैकी चार गोल पहिल्या सत्रात झाले आहेत. आघाडी फळीतील त्यांची भेदकताही कमी होत आहे. गेल्या दोन सामन्यांत भरपूर संधी मिळूनही त्यांना गोल करता आलेले नाहीत. नॉर्थईस्टचे प्रशिक्षक जेरार्ड न्यूस यांनी मैदानावर उतरल्यानंतर आपला संघ जोरदार आक्रमक खेळ करेल असे सांगितले.
न्यूस म्हणाले की, पराभवामुळे उसळी घेऊन विजय मिळवण्याची आमची आतूरता आणखी वाढली आहे. आम्हा सर्वांना एकत्र येऊन संघटित खेळ करण्याची संधी मिळाली आहे. उद्या आमचा संघ आक्रमक खेळ करणारा असेल. आम्ही तीन गुण मिळवण्याच्या निर्धाराने खेळू आणि तसे प्रत्येकाला सिद्ध करून दाखवू.