गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या हंगामात संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने ओडिशा एफसीवर 2-1 अशी मात करून आगेकूच केली. कर्णधार सुनील छेत्रीचा आयएसएलमधील वैयक्तिक पन्नासावा गोल विजयाचे वैशिष्ट्य ठरला. ब्राझीलचा मध्यरक्षक क्लेईटन सिल्वा याने बेंगळुरूचा दुसरा गोल करीत विजय निश्चीत केला. बेंगळुरू अपराजित असून हा त्यांचा सलग दुसरा विजय आहे.
आयएसएलमध्ये पन्नासावा गोल करणारा सुनील छेत्री हा पहिलाच भारतीय फुटबॉलपटू ठरला. त्याच्या गोलमुळे बेंगळुरूने मध्यंतरास 1-0 अशी आघाडी घेतली होती. ओडिशाने स्टीव्हन टेलरच्या गोलमुळे दुसऱ्या सत्रात बरोबरी साधली, पण सिल्वाने बेंगळुरुचे तीन गुण नक्की केले.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. बेंगळुरूचा हा 6 सामन्यांतील तिसरा विजय असून तीन बरोबरींसह त्यांचे 12 गुण झाले. त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला (6 सामन्यांतून 10) मागे टाकत गुणतक्त्यात एक क्रमांक प्रगती करीत तीनवरून चौथे स्थान गाठले. आतापर्यंत बेंगळुरू, नॉर्थईस्ट आणि हैदराबाद हे तीनच संघ अपराजित आहेत.
ओडिशाला सहा सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला. एकमेव बरोबरीसह एकच गुण व 11 संघांमध्ये त्यांचे शेवटून दुसरे म्हणजे दहावे स्थान कायम राहिले.
मुंबई सिटी एफसी आणि एटीके मोहन बागान यांचे प्रत्येकी 13 गुण आहेत. यात मुंबई सिटीचा 6 (9-3) गोलफरक एटीकेएमबीच्या 4 (7-3) पेक्षा सरस आहे. यामुळे मुंबई सिटी आघाडीवर आहे.
खाते उघडण्याची शर्यत बेंगळुरूने जिंकली. मध्य फळीतील डिमास डेल्गाडोने आपल्या क्षेत्रातून ओडिशाच्या क्षेत्रात चेंडू मारला. उजव्या बाजूला मध्य फळीतील खेळाडू हरमनज्योत खाब्रा याने चेंडूवर ताबा मिळवला. त्याने गोलक्षेत्रात मारलेल्या चेंडूवर छेत्रीने चपळाईने तसेच ताकद लावून हेडिंग केले. ओडिशाचा बचावपटू शुभम सारंगी तेव्हा जवळच होता, पण छेत्रीने कौशल्याने उडी घेत हेडिंगवर लक्ष्य साधले. त्याने नेटच्या उजव्या कोपऱ्यात मारलेला चेंडू ओदिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला अडवता आला नाही.
पुढे 71व्या मिनिटाला ओडिशाने बरोबरी साधली. मध्यरक्षक जेरी माहमिंगथांगा याने रचलेल्या चालीवर बचाव फळीतील इंग्लंडचा खेळाडू स्टीव्हन टेलर याने बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला चकवले. त्यानंतर आठ मिनिटांत बेंगळुरूने आघाडी घेतली. आघाडी फळीतील बदली खेळाडू देशोर्न ब्राऊन याच्या पासवर सिल्वा याने लक्ष्य साधले.
बेंगळुरूची सुरुवात सकारात्मक होती. पहिल्याच मिनिटाला त्यांनी कॉर्नर मिळवला. डेल्गाडोने गोलक्षेत्रात मारलेला चेंडू अर्शदीपने पुढे सरसावत हाताने थोपवला. दुसऱ्या मिनिटाला थ्रो-इनवर खाब्राने गोलक्षेत्रात मारलेला चेंडू मध्यरक्षक एरिक पार्टालू याने मागे मारला. त्यावर ताबा मिळवत जुआनन याने चेंडू पुन्हा पार्टालूकडे सोपवला. पार्टालूने मारलेला चेंडू ओडिशाचा बचावपटू जेकब ट्रॅट याला लागून क्रिस्तीयन ओप्सेथ याच्या दिशेने गेला. बेंगळुरूचा स्ट्रायकर ओप्सेथ चेंडू ताब्यात घेण्यासाठी व्यवस्थित संतुलन साधू शकला नाही. चेंडू त्याच्या बूटाला लागून नेटपासून लांब गेला.
पाचव्या मिनिटाला पार्टालूचा प्रयत्न अर्शदीपने फोल ठरवला. सातव्या मिनिटाला बेंगळुरूचा मध्यरक्षक सुरेश वांगजाम याने मध्य क्षेत्रात चेंडू मिळवून उजवीकडून आगेकूच केली. त्याने गोलक्षेत्रालगत मारलेल्या क्रॉस शॉटनंतर मध्यरक्षक क्लेईटन सिल्वा याने प्रयत्न केला, पण ओडिशाचा बचावपटू गौरव बोरा याने पायाने चेंडू थोपवला. जो डेल्गाडोच्या दिशेने गेला. डेल्गाडोने अकारण जास्त ताकद लावल्यामुळे फिनिशींग होऊ शकले नाही.
दहाव्या मिनिटाला ओडिशाचा मध्यरक्षक जेरी माहमिंगथांगा याने उजवीकडून सहकारी स्ट्रायकर मॅन्यूएल ओन्वू याला पास दिला. त्याच्याकडून दिएगो मॉरीसिओ याला अचूक पास मिळू शकला नाही. वास्तविक त्यावेळी मॉरीसिओला किंचीत संधी मिळाली असती तर बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याच्यावर दडपण आले असते.