गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी(30 नोव्हेंबर) एफसी गोवा संघासमोर पहिल्या विजयासाठी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचे आव्हान असेल. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर ही लढत होईल. नॉर्थईस्टने एक विजय आणि एका बरोबरीसह पहिल्या दोन सामन्यांत अपराजित मालिका राखली आहे.
गोव्याचे नवे प्रशिक्षक म्हणून सुत्रे स्विकारल्यानंतर जुआन फरांडो यांनी चटकन प्रभाव पाडला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचा खेळ चांगला होत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत गोव्याने आक्रमक खेळाचे धोरण कायम राखले, पण फुटबॉलमध्ये महत्त्वाचा असतो तो निकाल, ज्यात प्रभावी खेळानंतरही तीन गुण मिळविण्यात गोव्याला अपयश आले.
नॉर्थईस्टविरुद्ध हे चित्र पालटण्यासाठी फरांडो आतूर असतील. दोन निकाल प्रतिकूल लागले तरी आक्रमक खेळावरच त्यांचा भर राहील. फरांडो यांनी सांगितले की, तीन गुण जिंकण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. निकालांबाबत मी समाधानी नाही, कारण बेंगळुरू एफसीविरुद्ध आम्हाला जिंकण्याची जास्त संधी होती. मुंबई सिटीविरुद्ध आमच्या खेळाडूंना पुरेशा संधी मिळाल्या नाहीत.
गोव्यासाठी नॉर्थईस्ट हा काही सोपा प्रतिस्पर्धी नसेल. त्यांचा खेळ आक्रमक असतो. त्यांचे विंगर्स ड्रिबलिंगचे उत्तम कौशल्य प्रदर्शित करतात. याविषयी फरांडो यांनी सांगितले की, सामन्यावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे असेल आणि या सामन्यासाठी आमच्याकडे योजना आहे. तशी असणे महत्त्वाचे आहे. त्याविषयी मी जास्त स्पष्टीकरण देऊ शकत नाही, पण उद्या तुम्ही ते पाहू शकता.
गोव्याविरुद्ध गेल्या पाच सामन्यांत नॉर्थईस्टला एकही विजय मिळविता आलेला नाही. तीन पराभव आणि दोन बरोबरी अशी त्यांची कामगिरी झाली. प्रशिक्षक जेरार्ड न्यूस यांनी मात्र संघाची कामगिरी उंचावली आहे. मुंबई सिटीला धक्का दिल्यानंतर केरला ब्लास्टर्सविरुद्ध नॉर्थईस्टने एक गुण खेचून आणला. बचाव फळीतील बेंजामीन लँबोट आणि डायलन फॉक्स यांचा खेळ अद्वितीय ठरला आहे.
न्यूस यांनी सांगितले की, संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. पहिल्या दोन सामन्यांमधील कामगिरीनंतर खेळाडू रोमांचित झाले आहेत. खेळाडू तसेच संघ म्हणून आम्ही बऱ्याच बाबतीत सुधारणा करू शकतो. उद्याचा सामना सर्वांत महत्त्वाचा आहे. आमच्यासमोर मोठे आव्हान असेल. आम्हाला ते समजून खेळणे महत्त्वाचे आहे. गेल्या मोसमात गोव्याने साखळीत अव्वल स्थान मिळविले होते हे विसरून चालणार नाही.
फरांडो यांच्याप्रमाणेच न्यूस यांना सुद्धा सामन्यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे वाटते. न्यूस यांनी सांगितले की, जो संघ सामन्यावर नियंत्रण मिळवितो, तो विजयाच्या जास्त संधी निर्माण करतो. जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त संधी निर्माण करण्याचे आणि प्रतिस्पर्ध्याला जास्त निर्माण करू न देण्याचे आमचे लक्ष्य असेल.