---Advertisement---

आयएसएल २०२० : मुंबई सिटी एफसीने केरला ब्लास्टर्सवर विजय मिळवत घेतली गुणतक्त्यात आघाडी

On: शनिवार, जानेवारी 2, 2021 10:42 PM
---Advertisement---

गोवा। हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात नव्या वर्षातील पहिल्या सामन्यात मुंबई सिटी एफसीने केरला ब्लास्टर्सला 2-0 असे हरवून गुणतक्त्यात आघाडी घेतली. तिसऱ्याच मिनिटाला पेनल्टीवर खाते उघडलेल्या मुंबई सिटीने 11व्या मिनिटाला दुसरा गोल करीत मिळवलेली भक्कम पकड अखेरपर्यंत अबाधित राखली. मुंबई सिटीने पाच सामन्यांत क्लीन शीट राखली असून त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत केवळ तीन गोल झाले आहेत.

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. आघाडी फळीतील इंग्लंडचा 34 वर्षीय खेळाडू अॅडम ली फाँड्रे याने तिसऱ्याच मिनिटाला पेनल्टीवर मुंबई सिटीचे खाते उघडले. अॅडमचा हा आठ सामन्यांतील सहावा गोल ठरला. त्यानंतर 11व्या मिनिटाला मध्य फळीतील फ्रान्सचा 25 वर्षीय खेळाडू ह्युगो बुमूस याने संघाचा दुसरा गोल केला.

स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबई सिटीचा हा 8 सामन्यांतील सहावा विजय असून एक बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 19 गुण झाले. एटीके मोहन बागानला मागे टाकत मुंबई सिटीने आघाडी घेतली. एटीकेएमबीचे 8 सामन्यांतून 17 गुण आहेत. एफसी गोवा 9 सामन्यांतून 14 गुणांसह तिसऱ्या, तर जमशेदपूर एफसी 9 सामन्यांतून 13 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

स्पेनचे किबु व्हिकुना मार्गदर्शक असलेल्या ब्लास्टर्सला 8 सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. एकमेव विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे सहा गुण व शेवटून तिसरे म्हणजे नववे स्थान कायम राहिले.

मुंबईला आणखी मोठ्या फरकाने विजय मिळाला असता, पण दुसऱ्या सत्रात एक पेनल्टी वाया गेली. 71 व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा बचावपटू संदीप सिंगने ब्लास्टर्सच्या बॉक्समध्ये बुमूसला पाडले. त्यामुळे रेफरी गुप्ता यांनी मुंबई सिटीला पेनल्टी बहाल केली. बुमूसनेच ती घेतली, पण त्याने मारलेला चेंडू गोम्सने चपळाईने अडवला. गोम्सने मोसमात पाचव्यांदा पेनल्टी अडवली.

तिसऱ्या मिनिटाला ब्लास्टर्सचा बचावपटू कोस्टा न्हामोईनेस्कू याने मुंबई सिटीचा मध्यरक्षक ह्युगो बुमूस याला पाडले. त्यामुळे रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी मुंबई सिटीला पेनल्टी बहाल केली. त्यानंतर पेनल्टी घेण्यासाठी अॅडम पुढे आला. त्याने नेटच्या मध्यभागी मारलेला चेंडू ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स याने पायाने अडवण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या पायाला लागून नेटमध्ये गेला.

11व्या मिनिटाला ब्लास्टर्सला मिळालेली फ्री किक मध्यरक्षक व्हिसेंट गोमेझने घेतली, पण त्याने मारलेला चेंडू क्रॉसबारवरून गेला. त्याचवेळी ब्लास्टर्सने बनवलेल्या खेळाडूंच्या भिंतीच्या रचनेत नियमाचा भंग झाल्याचे रेफरी गुप्ता यांच्या लक्षात आले. त्यामुळे मुंबईला फ्री किक देण्यात आली. मध्यरक्षक अहमद जाहू याने मारलेल्या चेंडूचा अचूक अंदाज घेत बुमूसने अफलातून टायमिंग साधत गोल केला.

पहिल्या सत्रात ब्लास्टर्सने काही प्रयत्न केले, पण त्यांना फिनिशींगमध्ये अपयश आले. 21व्या मिनिटाला बुमूसने ब्लास्टर्सचा मध्यरक्षक साहल अब्दुल समद याला धसमुसळ्या पद्धतीने रोखले. त्यामुळे ब्लास्टर्सला फ्री किक देण्यात आली. साहलने मैदानालगत फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईच्या बचाव फळीने चेंडू रोखला.

28व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा मध्यरक्षक साहल अब्दुल समद याने प्रतिस्पर्धी बचावपटू मुर्तडा फॉल याच्या ढिलाईचा फायदा उठवित चेंडूवर ताबा मिळवला. त्याने बॉक्सलगत गोमेझला पास दिला. गोमेझने फटका मारला, पण मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंग याने डावीकडे झेपावत चेंडू अडवला.

दुसऱ्या सत्रात 78व्या मिनिटाला साहल अब्दुल समद याचा प्रयत्न अमरींदरने फोल ठरवला. त्याआधी 76व्या मिनिटाला साहलने व्हिसेंटला पास दिला होता, पण व्हिसेंटचा फउटका अमरींदरने थोपवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---