गोवा: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) साखळी फेरीत गुरुवारी (१६ डिसेंबर) बेंगलोर एफसी आणि एटीके मोहन बागान आमनेसामने येणार आहेत. मागील तीन सामन्यांतील खालावलेल्या कामगिरीनंतर उभय संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहेत.
बेंगलोर एफसीने यंदाच्या हंगामात निराशा केली आहे. गुणतालिकेत ते नवव्या स्थानी फेकले गेलेत. बेंगलोरच्या नावावर सहा सामन्यांत केवळ एक विजय आहे. तोही पहिल्या सामन्यातील आहे. मागील तीन सामने गमावल्याने त्यांच्यासमोर सलग चौथा पराभव टाळण्याचे आव्हान आहे. माजी विजेत्यांनी गेल्या पाच सामन्यांत तब्बल दहा गोल खाल्ले आहेत. सहा सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांकडून खालेले डझनभर गोल ही बंगलोरची आजवरची सर्वात वाईट कामगिरी आहे. ढेपाळलेल्या बचावासह निष्प्रभ आक्रमण त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. भारताचा नंबर वन गोलकीपर असूनही गुरप्रीत सिंग संधूकडून वारंवार चुका होत आहेत.
क्लीटन सिल्वा आणि प्रिन्स इबारा या परदेशी फुटबॉलपटूंनीही निराशा केली आहे. ब्राझीलच्या सिल्वाने गोल करण्याच्या ११ संधी निर्माण केल्या तरी त्याला पहिल्या सहा सामन्यांत केवळ तीन गोल करता आले. कर्णधार सुनील छेत्रीही लौकिकाला साजेसा खेळ करू शकलेला नाही. आमचे खेळाडू मागील चुका सुधारण्याचा कसून प्रयत्न करत आहेत. सरावादरम्यान तसे जाणवले. मोहन बागानविरुद्ध आम्ही विजयासाठी पात्र आहोत, असे बंगलोरचे प्रशिक्षक मार्को पेझाइओली यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.
एटीके मोहन बागानची स्थिती फारशी चांगली नाही. गत हंगामात उपविजेतेपद मिळवलेल्या बागानने ५ सामन्यांत ८ गोल खाल्लेत. अँटोनियो लोपेश हबास यांच्या प्रशिक्षकपदाखालील एटीकेने ७ गुणांसह सहाव्या स्थान राखले आहे. सलग दोन विजय मिळवत त्यांनी धडाकेबाज सुरुवात केली तरी मागील तीन सामन्यांत लागोपाठ दोन पराभव पाहावे लागलेत. शेवटच्या सामन्यात चेन्नईयन एफसीविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागलेले. बेंगलोरला हरवल्यास त्यांना अव्वल चार संघांत स्थान मिळवण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी प्रमुख खेळाडूंना कामगिरी उंचवावी लागेल. ह्युगो बॉमॉसने केरला ब्लास्टर्सविरुद्ध दोन गोल करताना २०२१-२२ हंगामाची धडाकेबाज सुरुवात केली. मात्र, त्यानंतर त्याला गोल करता आला नाही. तसेच गोलसाठी संधीही निर्माण करता आलेली नाही. बंगलोरविरुद्ध फिजीचा स्ट्रायकर रॉय क्रिष्णाला संधी मिळाल्यास आयएसएलमध्ये ५० खेळणारा तो ५० वा परदेशी फुटबॉलपटू ठरेल. बेंगलोर एफसीला अपेक्षित कामगिरी करता आली नसली तरी आम्ही प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखणार नाही. मात्र, तीन गुण मिळवण्याचा आम्ही प्राधान्य देऊ, असे प्रशिक्षक हबास यांनी म्हटले आहे.