गोवा दिनांक ५ फेब्रुवारी – इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) शनिवारी बंगलोर एफसी व जमशेदपूर एफसी या तुल्यबळ संघांत अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. विजयी हॅटट्रिक नोंदवून मैदानावर उतरलेल्या जमशेदपूर एफसीने पहिल्याच मिनिटाला गोलखाते उघडले, परंतु मध्यंतरानंतर बंगलोर एफसीकडून प्रत्युत्तर मिळाले. बंगलोरच्या पराग श्रीवासने सुरेख कौशल्य दाखवताना जमशेदपूर एफसीचा बरोबरीचा गोल होऊ दिला नाही. बंगलोरने ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना हा सामना ३-१ असा जिंकून विजयी हॅटट्रिक पूर्ण केली.
डॅनिएल चुक्वू ( १ मि. ) पहिल्याच मिनिटाला जमशेदपूरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिल्या हाफ मध्ये त्यांनी वर्चस्व गाजवले. दुसऱ्या हाफमध्ये बंगलोरने कमबॅक करताना सुनील छेत्री ( ५५ मि.) व क्लेइटन सिल्वा ( ६२ मि. व ९०+३ मि. ) यांच्या गोलच्या जोरावर ३-१ असा विजय मिळवला. या गोलच्या जोरावर सुनील पुन्हा एकदा आयएसएलच्या इतिहासात सर्वाधिक ४९ गोलसह बार्थोलोमेव ऑग्बेचेसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर पोहोचला. बंगलोरने या निकालासह सलग ९ सामन्यांत अपराजित मालिकाही कायम राखली. बंगलोर आता २३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
जमशेदपूर एफसी संघाने पहिल्याच मिनिटाला गोल केला. बंगलोर एफसीच्या खेळाडूंनी मध्यरेषेवरून चेंडूवरील ताबा गमावला आणि अॅलेक्झांड्रे लिमा तो चेंडू बॉक्समध्ये घेऊ गेला. त्याने तो चेंडू पेनल्टी क्षेत्रात उभ्या असलेल्या बोरीस सिंगकडे पास केला आणि त्याने तो डॅनिएल चुक्वूच्या स्वाधीन केला. चुक्वूने कोणतीच चूक न करता जमशेदपूरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ४२व्या मिनिटाला कॉर्नरवरून आलेला चेंडूवर क्लेटन सिल्वा आणि सुनील छेत्री या दोघांनाही हेडरद्वारे गोल करण्यात अपयश आले. इथे बंगलोरने बरोबरीची सोपी संधी गमावली.
पूर्वाधाच्या तुलनेत मध्यंतरानंतर बंगलोरच्या बचावफळीत सुधारणा दिसली. ५२व्या मिनिटाला थ्रो ईनवर आलेल्या पासवर ब्रुनो सिल्वाने हेडरद्वारे चेंडूला पेनल्टी क्षेत्रात असलेल्या सुनील छेत्रीच्या दिशेने दिशा दिली. छेत्रीने कोणतीच चूक न करता गोल करून बंगलोरला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. या बरोबरीनंतर बंगलोरचा खेळ आणखी उंचवला. ६२व्या मिनिटाला बंगलोरने आघाडीचा गोल केला. रोशन नाओरेमने कॉर्नरवरून सुरेख पास दिला आणि त्यावर क्लेइटन सिल्वाने हवेत झेपावत हेडरद्वारे गोल केले. जमशेदपूरचा मध्यरक्षक जितेंद्र सिंग याने पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याला व गोलरक्षक टीपी रेहेनेशला चकवून गोलजाळीत विसावला.
८०व्या मिनिटाला ग्रेग स्टीवर्टने जवळपास बरोबरीचा गोल केलाच होता. चुक्वूच्या बॅक पासवर त्याने पेनल्टी क्षेत्रातून चेंडू गोलजाळीच्या दिशेनं पाठवला आणि गोलरक्षक गुरप्रीत संधूलाही चकवले होते. चेंडू गोलजाळीत विसावणार तेवढ्यात पराग श्रीवासने हवेत झेपावत चेंडूची दिशा बदलली आणि जमशेदपूरचा बरोबरीचा गोल होऊ दिला नाही. यानंतर बंगलोरच्या खेळाडूंनी मिठी मारून पगारचे कौतुक केले. भरपाईच्या तिसऱ्या मिनिटाला क्लेइटनने आणखी एक गोल करून बंगलोरचा ३-१ असा विजय पक्का केला.
निकाल – बंगलोर एफसी ३ ( सुनील छेत्री ५५ मि., क्लेइटन सिल्वा ६२ मि. व ९०+३ मि ) विजयी विरुद्ध जमशेदपूर एफसी १ ( डॅनिएल चुक्वू १ मि. ).